विकसित भारतासाठी ‘स्वदेशी’च वापरा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन

महात्मा गांधींनी ‘स्वदेशी’चा वापर स्वातंत्र्याचे शस्त्र म्हणून केला. आजच्या काळात ‘स्वदेशी’ हे विकसित भारताचे पायाभूत तत्त्व व्हायला हवे. त्यामुळे घरगुती वापराच्या छोट्या वस्तू, मुलांच्या खेळणी, गृहसजावटीच्या वस्तू किंवा मोबाईल, टीव्ही, फ्रिजसारख्या मोठ्या खरेदीपर्यंत सर्व वस्तू ‘स्वदेशी’च वापराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले.
विकसित भारतासाठी ‘स्वदेशी’च वापरा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन
Photo : X (@narendramodi)
Published on

धार (मध्यप्रदेश) : महात्मा गांधींनी ‘स्वदेशी’चा वापर स्वातंत्र्याचे शस्त्र म्हणून केला. आजच्या काळात ‘स्वदेशी’ हे विकसित भारताचे पायाभूत तत्त्व व्हायला हवे. त्यामुळे घरगुती वापराच्या छोट्या वस्तू, मुलांच्या खेळणी, गृहसजावटीच्या वस्तू किंवा मोबाईल, टीव्ही, फ्रिजसारख्या मोठ्या खरेदीपर्यंत सर्व वस्तू ‘स्वदेशी’च वापराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले.

मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील ‘प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲॅपरल पार्क’च्या भूमिपूजनानंतर ते सभेला संबोधित करत होते. यावेळी मोदींनी ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ व आठव्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ मोहिमांची सुरुवात केली.

ते म्हणाले की, स्वदेशीमुळे पैसा देशात राहतो. भांडवलाची गळती थांबते आणि थेट राष्ट्रीय विकासाला हातभार लागतो. याच पैशातून रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली जातात आणि कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत पोहोचतात, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, कालच देशाने आणि जगाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला रडताना आणि आपली व्यथा सांगताना पाहिले. ते ‘जैश-ए-मोहम्मद’च्या (जेईएम) कमांडरच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओकडे सूचित करत होते, ज्यात भारतीय जवानांनी त्यांच्या तळांवर कसे हल्ले केले याचे वर्णन आहे.

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर काही महिन्यांनी, जैशच्या कमांडरने मान्य केले की बहावलपूरवरील हल्ल्यात संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्या कुटुंबाचे “तुकडे तुकडे” झाले.

हा नवा भारत

हा नवा भारत आहे, जे अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही. हे शत्रूच्या घरात घुसून प्रहार करते, असे मोदी म्हणाले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या-मुलींच्या कुंकवाचा अपमान केला. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दहशतवादी लॉन्च पॅड्स उद्ध्वस्त केले,” असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की सणासुदीच्या काळात स्वदेशीचा मंत्र पुन्हा दृढ करणे गरजेचे आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, ज्या वस्तू विकत घ्याल किंवा विकाल ते भारतात तयार झालेले असावे.

२२ सप्टेंबरपासून, म्हणजेच नवरात्रीच्या सुरुवातीपासून कमी झालेल्या जीएसटी दरांचा लाभ घ्या आणि स्वदेशी वस्तू खरेदी करा, असे मोदी म्हणाले.

‘मेड इन इंडिया’ वस्तूंची दुकाने उभारून ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ असे बोर्ड लावावेत,” अशी सूचना त्यांनी केली.

हैदराबाद लिबरेशन डे

नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना हैदराबाद मुक्ती दिनाचीदेखील आठवण काढली. ते म्हणाले की, आज १७ सप्टेंबर रोजी एक आणखी ऐतिहासिक दिवस आहे. आजच्याच दिवशी देशाने सरदार पटेल यांच्या पोलादी इच्छाशक्तीचे उदाहरण पाहिले होते. भारतीय लष्कराने हैदराबादला अत्याचारांपासून मुक्त करून त्यांच्या अधिकारांचे रक्षण करत भारताचा गैरव पुन्हा प्रस्थापित केला होता.

२५ कोटी लोक गरिबीबाहेर

सरकारच्या धोरणांचा परिणाम जगासमोर दिसत आहे. आता २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, असा दावा मोदींनी केला. मोदींनी ‘सुमन सखी चॅटबॉट’चेही उद्घाटन केले, जे ग्रामीण व दुर्गम भागातील गर्भवती महिलांना मातृ-शिशु आरोग्याविषयी योग्य माहिती देईल.

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहीम

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेबाबत मोदी म्हणाले की, कोणत्याही महिलेला अज्ञानामुळे किंवा संसाधनांच्या अभावामुळे त्रास होऊ नये. उच्च धोका असलेल्या आजारांचे उशिरा निदान होऊन गंभीर परिणाम होतात, त्यावर ही मोहीम प्रभावी ठरेल. हे मोहीम १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबवले जाईल. या मोहिमेत रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग आणि कर्करोग आदी आजारांची तपासणी केली जाईल. या सर्व तपासण्या आणि औषधे मोफत दिली जातील, त्याचा खर्च सरकार उचलेल, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागातील ‘सिकल सेल ॲनिमिया’च्या आव्हानावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, २०२३ मध्ये या आजाराविरोधात राष्ट्रीय मोहीम सुरू केली गेली. ही मोहीम मध्य प्रदेशातील शहडोल येथून सुरू झाली होती, जिथे पहिला ‘सिकल सेल स्क्रिनिंग कार्ड’ देण्यात आला. आज मी या कार्यक्रमात एक कोटीवे कार्ड एका मुलीला दिले,” असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in