

लखनौ : उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांना बुधवारी संध्याकाळी बसलेल्या भीषण वादळाच्या तडाख्यात आणि मुसळधार पावसामुळे किमान १०४ जणांचा मृत्यू झाला असून ५३ जण जखमी झाले आहेत. सोसाट्याचा वारा, पाऊस आणि वीज पडल्यामुळे झाडे उन्मळून पडली असून घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मदतकार्य आयुक्तांच्या कार्यालयाने गुरुवारी या जीवितहानीची पुष्टी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीत ८७ घरांचे नुकसान झाले असून ११४ पाळीव जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
प्रयागराज जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून हंडिया, फूलपूर, सोराव आणि मेजा भागात १७ जणांचा बळी गेला आहे. भदोही जिल्ह्यात किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून तेथे गंगेवरील तात्पुरता पूल (पँटून ब्रिज) वाहून गेल्याने काही लोक नदीत पडले होते, मात्र त्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले. मिर्झापूरमध्येही अशाच प्रकारे पूल निकामी झाल्याने २० गावांचा संपर्क तुटला आहे. फतेहपूरमध्ये ९, प्रतापगडमध्ये ४, कानपूर देहातमध्ये २ आणि देवरियात २ जणांचा मृत्यू झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बरेलीमधील एक व्यक्ती पत्र्यासह ५० फूट हवेत उडाल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पीडित कुटुंबांशी थेट संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना २४ तासांच्या आत आर्थिक मदत वितरित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.