
उत्तरकाशी : निसर्गाच्या प्रकोपाची चुणूक मंगळवारी उत्तराखंड राज्यातील धराली गावात दिसून आली. दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास गावात ढगफुटी होऊन संपूर्ण गाव गाडले गेले. यात चौघांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. यानंतर राज्य आपत्कालीन दल, राष्ट्रीय आपत्कालीन दल, ‘आयटीबीपी’ व लष्कराने तातडीने मदतकार्य हाती घेतले असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते.
खीर गंगा नदीत डोंगरावरून आलेल्या चिखल व पाण्यामुळे धरालीतील बाजार, दुकान, हॉटेल्स वाहून गेली. अवघ्या ३४ सेकंदांत सर्व उद्ध्वस्त झाले.
उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य म्हणाले की, प्राथमिक अंदाजानुसार चौघांचा मृत्यू झाला आहे. हरसील येथून लष्करी पथक मदतीसाठी रवाना झाले आहे.
धराली गावातील नागरिक राजेश पन्वर म्हणाले की, १० ते १२ जण या मलब्यात गाडले गेले आहेत, तर २० ते २५ होमस्टे व हॉटेल वाहून गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, सात मदत पथके आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत.
उत्तराखंडमध्ये नांदेडचे दहा पर्यटक अडकले
नांदेडचे दहा पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. तीन कुटुंबातील ११ जण पर्यटन करायला उत्तराखंडमध्ये फिरायला गेले होते. त्यांचा अजूनही नांदेड प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही. सुखरूप ठिकाणी पोहचण्यासाठी या पर्यटकांना २५ किमीचा पायी प्रवास करावा लागल्याचे वृत्त आहे.