उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; चारधाम यात्रा एक दिवसासाठी स्थगित, भूस्खलनात दोन कामगारांचा मृत्यू

उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन निवारा उद्ध्वस्त झाल्याने रविवारी दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य सात कामगार बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या भीतीमुळे चार धाम यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; चारधाम यात्रा एक दिवसासाठी स्थगित, भूस्खलनात दोन कामगारांचा मृत्यू
Published on

उत्तरकाशी : उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन निवारा उद्ध्वस्त झाल्याने रविवारी दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य सात कामगार बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या भीतीमुळे चार धाम यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथे यात्रेकरूंना थांबविण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल हवामान परिस्थिती लक्षात घेता, यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विनय पांडे यांनी म्हटले.

उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील बारकोट तहसीलमधील सिलाई बंद भागात भूस्खलनाच्या दुर्दैवी घटनेत अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे, हवामान खात्याने मुसळधार पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. बागेश्वर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कामगारांचे मृतदेह

यमुना नदीवरील तिलादी शहीद स्मारकाजवळ दोन बेपत्ता कामगारांचे मृतदेह सापडले. अन्य सात बेपत्ता कामगारांचा एनडीआरएफ आणि एसडीआरफकडून शोध घेतला जात आहे. उत्तरकाशीतील बारकोट येथील सिलाई बंद परिसरात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफ, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in