उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये सुरू असलेलं ४१ जणांना वाचवण्याचं रेस्क्यू ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये काही बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे 7 तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. काही तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थितीत आजच हे बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
आज कोणत्याही क्षणी उत्तराखंडच्या उत्तर काशी येथील निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका होऊ शकते, असं प्रशासनाने सांगितलं आहे. बोगद्यात जे ४१ अडकलेले मजूर आहेत ते बाहेर येताच, सर्वात आधी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर उर्वरित प्रक्रिया केली जाईल. याच पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली असून डॉक्टरांना घटनास्थळी दाखल करण्यात आलं आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम बुधवारी अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. अडकलेल्या कामगारांपासून प्रशासन काहीच अंतर दूर आहे.
दरम्यान, १२ नोव्हेंबरपासून या बोगद्यात कामगार अडकले आहेत. बचाव कर्मचार्यांनी ढिगाऱ्यांमध्ये 45 मीटर रुंद पाईप यशस्वीरित्या टाकली आहे. आता फक्त काही मीटरचे आच्छादन उरलं आहे. त्यानंतर बचाव पथक बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना पाईपद्वारे बाहेर काढतील. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कर्मचार्यांना एकूण 57 मीटर ड्रिल करावं लागणार आहे . ढिगाऱ्यात 39 मीटरपर्यंत स्टीलचे पाईप टाकण्यात आली आहे.