जम्मू : जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर सोमवारी झालेल्या भूस्खलनात एका भाविकाचा मृत्यू झाला असून अन्य दहा जण जखमी झाले. भूस्खलनामुळे यात्रा दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली होती.
कटरा शहरात त्रिकुटा टेकड्यांवरील मुसळधार पावसामुळे बाणगंगाजवळील गुलशन का लंगर येथे सकाळी ८.५० वाजता ही घटना घडली. बचाव पथकाने तत्काळ बचावकार्य राबवत अडकलेल्या यात्रेकरूंना रुग्णालयात दाखल केले.
भूस्खलनानंतर काही वेळातच मोठमोठे दगड थेट रस्त्यावर पडले, त्यामुळे टिन शेडचे नुकसान झाले. यात घोडागाडी आणि पालखी इत्यादी सेवा सुरळीत करण्यासाठी एमटेक कंपनीने उभारलेले मुख्य प्रीपेड काऊंटर देखील पूर्णपणे खराब झाले. या भूस्खलनात तीन भाविकांना गंभीर जखम झाली असून सात जणांना किरकोळ जखम झाली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डचे कार्यकारी अधिकारी सचिन कुमार वैश्या यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सुरेश कुमार (६६) आणि निखिल ठाकूर (२६) तसेच विकी शर्मा या दोन स्थानिक तरुणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्यांवर जुजबी औषध उपचार करण्यात आले.