'स्लो' झाली ‘वंदे भारत’, तीन वर्षांत मंदावला वेग; RTI मध्ये उघड

वेगवान प्रवासासाठी बनलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा वेग गेल्या तीन वर्षांत मंदावल्याचे उघड...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : आधुनिक पद्धतीने बांधणी, सुंदर रचना व वेगवान प्रवासासाठी बनलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा वेग गेल्या तीन वर्षांत मंदावल्याचे उघड झाले आहे. या गाडीचा सरासरी वेग ८४ वरून ७६ किमी प्रति तास झाला आहे.

२०२०-२१ मध्ये ‘वंदे भारत’चा वेग ताशी ८४.४८ किमी होता. आता तो ताशी ७६.२५ किमी सरासरी झाला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात सांगितले. ‘वंदे भारत’च नव्हे तर अनेक एक्स्प्रेसच्या वेगावर नियंत्रण आले आहे. कारण मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे काम बाकी आहे. काही ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस दुर्गम भागात सुरू केल्या. भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांच्या वेगावर नियंत्रण आले.

‘सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस’चे उदाहरण देताना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोकण रेल्वे ही बहुतेक घाटातून जाते. त्यातही अनेक डोंगर उंचीने कमी आहेत. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन वेगावर तडजोड करावीच लागते. कोकण रेल्वेवर सर्व गाड्यांचा वेग ७५ किमी असतो.

मध्य प्रदेशचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी सांगितले की, २०२०-२१ मध्ये ‘वंदे भारत’चा सरासरी वेग ताशी ८४.४८ होता. २०२२-२३ मध्ये हाच ताशी वेग ८१.३८ इतका घटला, तर २०२३-२४ मध्ये तो ताशी ७६.२६ पर्यंत घसरला आहे.

भारतात १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिल्यांदा सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली. तिचा जास्तीत जास्त वेग १६० किमी होता. मात्र, आतापर्यंत ही गाडी १३० किमी प्रतितासापेक्षा धावली नाही. मात्र, दिल्ली-आग्रा रेल्वेमार्ग अधिक वेगवान बनला आहे. या मार्गावर २०१६ मध्ये गतिमान एक्स्प्रेस १६० किमी वेगाने धावली, तर ‘वंदे भारत’ ही १६० किमी ताशी वेगाने धावू शकते. तरीही ही गाडी ताशी १३० किमी वेगाने धावू शकली नाही, असे रेल्वेच्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वेमार्ग आधुनिक करण्याचे काम सुरू

‘वंदे भारत’साठी सर्व रेल्वेमार्ग आधुनिक करण्याचे काम सुरू आहे. एकदा हे मार्ग आधुनिक झाल्यास ही रेल्वे २५० किमी प्रतितास धावू शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही मार्गांवर ‘वंदे भारत’चा वेग अतिशय कमी आहे. डेहराडून-आनंदविहार (ताशी ६३.४२ किमी), पाटणा-रांची (ताशी ६२.९ किमी) आणि कोईम्बतूर-बंगळुरू केंट मार्गावर (ताशी ५८.११ किमी) वेग आहे. ‘वंदे भारत’ ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. ३१ मार्चपर्यंत २.१५ कोटी प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला.

logo
marathi.freepressjournal.in