वंदे भारत स्लीपर ट्रेन चाचणीत उत्तीर्ण; प्रतितास १८० किलो मीटरचा गाठला टप्पा

वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनने अलीकडील चाचण्यांदरम्यान १८० किमी/तासचा सर्वाधिक वेग यशस्वीरित्या नुकताच गाठला.
वंदे भारत स्लीपर ट्रेन चाचणीत उत्तीर्ण; प्रतितास १८० किलो मीटरचा गाठला टप्पा
एक्स @PIBMumbai
Published on

वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनने अलीकडील चाचण्यांदरम्यान १८० किमी/तासचा सर्वाधिक वेग यशस्वीरित्या नुकताच गाठला. राजस्थानमधील कोटा विभागात झालेल्या चाचणीने वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनची उच्च-गती, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीची क्षमता आणि अद्वितीय सोयीची क्षमता सिद्ध केल्याचे मानले जाते.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चाचणीचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टाकला असून भारतीय रेल्वेचे हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक वेग असूनही रेल्वेच्या डब्यात ठेवलेला पाण्याचा ग्लास स्थिर राहिला. संशोधन आरेखन आणि मानक संस्थेने ही चाचणी पूर्ण भार असलेल्या स्थितीत ट्रेनच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी घेतली जात आहे, असेही सांगण्यात आले.

या चाचण्या संपूर्ण जानेवारीत सुरू राहणार असून त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अधिकाधिक वेगावर मूल्यांकन केले जाईल. अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतरच वंदे भारत रेल्वे अधिकृतपणे प्रमाणित केली जाईल आणि नियमित सेवेत सामील केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

वंदे भारत स्लीपर ट्रेनने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोयी-सुविधांची पुनर्मांडणी केली असून त्यात स्वयंचलित दरवाजे, आरामदायी आसने, ऑनबोर्ड वाय-फाय, विमानासारखी अंतर्गत रचना आदींचा समावेश आहे.

सध्याच्या १३६ वंदे भारत एक्स्प्रेस (चेअर कार) ट्रेनप्रमाणेच नवीन स्लीपर ट्रेन सज्ज आहे. या रेल्वेमुळे कश्मीर ते कन्याकुमारी, दिल्ली ते मुंबई, हावडा ते चेन्नई यासारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवासाचा वेळ कमी होईल, अशी आशा आहे.

वंदे भारत ट्रेनचा सध्याचा सरासरी वेग मुंबई-दिल्लीसाठी सध्याचा सरासरी वेग ९० किमी/तास आहे. तर तेजस राजधानी एक्स्प्रेससाठी कमाल वेग १४० किमी/तास आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन १८० किमी/तास वेगामुळे वेळेची लक्षणीय बचत होईल, असे सांगण्यात येते.

वंदे भारत स्लीपर रेल्वे चाचणी वैशिष्ट्ये :

२ जानेवारी : कोटा ते लाबान (बुंदी जिल्हा) दरम्यान ३० किमीच्या अंतरावर १८० किमी/तास वेग गाठला

१ जानेवारी : रोहल खुर्द ते कोटा दरम्यान ४० किमी चाचणीदरम्यान असाच वेग गाठला

अन्य विभाग : कोटा-नागदा आणि रोहल खुर्द-चौ महला दरम्यान १७० किमी/तास आणि १६० किमी/तास वेग गाठला

logo
marathi.freepressjournal.in