
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर ते कटरादरम्यान ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन एप्रिलमध्ये होणार होते. मात्र, ते पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुढे ढकलण्यात आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ जून रोजी या संपूर्ण रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे श्रीनगर ते कटरा हा प्रवास केवळ तीन तासांत पूर्ण होणार आहे.
या रेल्वेमार्गाच्या व ‘वंदे भारत’ ट्रेनच्या उद्घाटनानंतर कटरा स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदी हे एका सभेला संबोधित करणार आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा असणार आहे.
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रीजही होणार कार्यान्वित
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला ते संगलदानपर्यंत रेल्वेमार्ग कार्यान्वित आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनानंतर या रेल्वेमार्गावरील दुर्गम भागातून रेल्वेगाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रीजचे उद्घाटननही यावेळी होईल. या ब्रीजच्या उद्घाटनानंतर मोदी हे रेल्वे प्रवास करतील. तसेच ते अंजी खेड येथील केबल स्टेड पुलाची पाहणी करतील. या प्रकल्पात सहभागी झालेल्या रेल्वे अभियंत्यासोबत ते संवाद साधणार आहेत. माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकातून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे कटरा ते उत्तर काश्मिरातील बारामुल्लापर्यंत जाणार आहे.
बोगद्यांची लांबी ११९ किमी
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मार्गावर बोगद्यांची लांबी ११९ किमी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या सर्व मार्गावर सीसीटीव्ही बसवले आहेत. या बोगद्यातील प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. या रेल्वे मार्गामुळे जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या प्रवासात मोठा बदल होणार आहे. यामुळे दळणवळण सोपे होणार आहे.
देशातील सर्वात लांब बोगदा याच मार्गावर
कटरा-बनिहाल विभाग १११ किमीचा आहे. त्यातील ९७.४ किमीचा भाग बोगद्यांचा आहे. या मार्गावरील सर्वात मोठा ‘टी-५०’ बोगदा हा १२.७७ किमीचा आहे. हा बोगदा देशातील सर्वात मोठा आहे. या बोगद्यातून आपत्कालीन परिस्थितीत सुटकेचीही व्यवस्था केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जगातील सर्वात उंच पूल
या रेल्वे मार्गावरील ३६९ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. २५० किमी वेगवान वाऱ्यांनाही तो तोंड देऊ शकेल. तसेच मोठा भूकंप सहन करण्याची याची क्षमता आहे.
३० वर्षांनंतर स्वप्न प्रत्यक्षात
जम्मू-काश्मीरला अन्य भारताशी जोडण्याचे स्वप्न ३० वर्षांनी प्रत्यक्षात उतरणार आहे. रेल्वेमुळे काश्मीरमधील दळणवळण सुधारणार असून भारताशी आर्थिक, सामाजिक व भावनिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत.