'वंदे भारत' ट्रेनची निर्यात होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; म्हणाले- "अनेक देशांना..."

वंदे भारत ट्रेनसंदर्भात प्रवाशांच्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यानुसार ट्रेनमध्ये बदल केले जात आहेत.
'वंदे भारत' ट्रेनची निर्यात होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; म्हणाले- "अनेक देशांना..."
Published on

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच सादर केले जाणार आहे. आता या ट्रेनच्या निर्यातीसाठी भारतीय रेल्वे काम करत असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा या मार्गांवर चालवल्या जात असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १६० किमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले. वंदे भारत ट्रेनचे स्वदेशी डिझाइन आणि या ट्रेनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सहकार्याशिवाय फॅक्टरीतील कामकाज सक्षम करत आहे. ‘‘आपल्या इंजिनिअर्सच्या मदतीने देशात वंदे भारत ट्रेन तयार करणे हे मोठे आव्हान होते. आम्ही हे आव्हान पेलले. वंदे भारत ट्रेनबाबत अनेक देशांनी चौकशी केली आहे. अनेक देशांना वंदे भारत ट्रेन हवी आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत हा इतर देशांना वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन निर्यात करण्यास सक्षम असेल,’’ असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.

वंदे भारत ट्रेनसंदर्भात प्रवाशांच्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यानुसार ट्रेनमध्ये बदल केले जात आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि संरक्षणासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in