Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

जवळच्या शहरांना जोडण्याकरता लवकरच वंदे मेट्रो ट्रेन (Vande Bharat Metro Train) सुरु होणार आहे. काय आहे या ट्रेनची खासियत? जाणून घेऊया.
वंदे भारत मेट्रो
वंदे भारत मेट्रो(x-@railwaterman)
Published on

सध्या देशभरात वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सेमी हाय स्पीड ट्रेनच्या स्वरुपात चालवली जात आहे. त्यानंतर आता जवळच्या शहरांना जोडण्याकरता लवकरच वंदे मेट्रो ट्रेन (Vande Bharat Metro Train) सुरु होणार आहे. या श्रेणीतील पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे डबे पंजाबमधील कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तयार केले गेले आहेत. याबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भगव्या रंगाची वंदे मेट्रो ट्रॅकवर चालताना दिसत आहे. रिपोर्टनुसार जुलैमध्ये या ट्रेनची ट्रायल रन घेतली जावू शकते. सध्या ५० वंदे भारत मेट्रो ट्रेनची निर्मिती केली जात असून सुमारे ४०० वंदे मेट्रो ट्रेन विकसित करण्याची सरकारची योजना आहे.

वंदे मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये:

अत्याधुनिक डिझाइन असणारी ही ट्रेन सुमारे १०० ते २५० किमी अंतरातील शहरांना जोडण्याचं काम करेल. वंदे मेट्रोमध्ये १२ कोच असल्याचं बोललं जात आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार कोचची संख्या १६ पर्यंत वाढवली जावू शकते. देशभरातील १२४ प्रमुख शहरांना जोडण्याचं काम ही ट्रेन करेल. सुरुवातीच्या टप्प्यात लखनऊ- कानपूर, आग्रा-मथुरा आणि तिरुपती-चेन्नई या मार्गांवर वंदे मेट्रो ट्रेन चालवली जाईल. वंदे भारत मेट्रो पूर्णपणे वातानुकूलिक आणि दिसायला तितकीच आकर्षक आहे.

किती असेल वेग?

ही ट्रेन १३० किमी प्रतितास वेगानं प्रवास करेल. ट्रेनच्या प्रत्येक कोचमधून २८० प्रवासी प्रवास करू शकतील. यामध्ये १०० प्रवासी बसून तर १८० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. वंदे मेट्रोमध्ये प्रवाशांना लोको पायलटशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक सिस्टीम, फेयर-स्मोक सिस्टीम आणि सुरक्षेसाठी कवच सिस्टीमसारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. कामानिमित्त अथवा इतर कारणांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in