नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात ‘मनरेगा’ हे नाव बदलण्यासह अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करणारे 'विकसित भारत-जी राम जी' विधेयक गुरुवारी लोकसभेत प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक पटलावर ठेवले होते. दरम्यान, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कागदाचे तुकडे भिरकावल्याने सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
विधेयकाचे समर्थन करताना चौहान म्हणाले, ‘मनरेगा’ योजना भ्रष्टाचाराचा अड्डा बनली होती. नवीन बदलांमुळे या योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होण्यास मोठी मदत होईल. राज्य सरकारांचा सहभाग वाढवून ही योजना अधिक प्रभावी केली जाणार आहे. महात्मा गांधींच्या नावाच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले, रामराज्य हे तर बापूंचेच स्वप्न होते, बापू आजही आपल्या सर्वांसोबत आहेत, यामुळे त्यांचे नाव हटवण्याचा किंवा अपमान करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.
अहिंसेच्या धोरणाविरुद्ध
चौहान यांनी विरोधकांना अहिंसेची आठवण करून देत, विधेयकाची प्रत फाडणे हे महात्मा गांधींच्या अहिंसेच्या धोरणाविरुद्ध आहे, असे म्हणत विरोधकांवर जोरदार टीका केली. या विधेयकावर कडाडून टीका करताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, हे विधेयक म्हणजे ‘मनरेगा’ योजना संपवण्याचा एक मोठा कट आहे. याशिवाय, एवढ्या महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला.
केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, ‘मनरेगा’ऐवजी केंद्र सरकारच्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ‘विकसित भारत २०४७’ या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला हातभार लावणे. मोदींच्या राष्ट्रीय व्हिजनला अनुरूप असा ग्रामीण विकासाचा पाया रचणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मागील २० वर्षांमध्ये ‘मनरेगा’ने ग्रामीण कुटुंबांना रोजगार दिला. परंतु, गावांमध्ये अलीकडच्या काळात अनेक सामाजिक व आर्थिक बदल झाले आहेत. त्या आधारावर आता ही योजना अधिक व्यापक व मजबूत करणे आवश्यक आहे, आम्ही नेमके तेच करत आहोत.
दरम्यान, सभागृहात विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून भिरकावल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण सभागृहात जनतेचे मुद्दे मांडायला हवेत. गदारोळ केल्याने आणि विधेयकाची प्रत फाडून फेकल्याने, प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले.
प. बंगालमधील योजनेला महात्मा गांधीजींचे नाव - ममता
पश्चिम बंगाल सरकार आपल्या ग्रामीण रोजगार योजनेचे नामकरण करणार असून त्याला महात्मा गांधीजींचे नाव देणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले आणि ‘मनरेगा’चे नाव बदलल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारला फटकारले. काही राजकीय पक्षांना आपल्या देशाच्या महान व्यक्तींबद्दल आदर नसला तरी आम्ही त्यांचा नेहमीच आदर करू, असेही बॅनर्जी यांनी भाजपचा नामोल्लेख न करता म्हटले आहे.