
उधगमंडलम : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम. आर. श्रीनिवासन यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
सप्टेंबर १९५५ मध्ये श्रीनिवासन यांनी अणुऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला. भारताची पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ हिच्या उभारणीत भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे प्रणेते डॉ. होमी भाभा यांच्यासोबत त्यांनी काम केले. १९५९ मध्ये भारतातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीत ते प्रधान प्रकल्प अभियंता होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणु प्रकल्पाला दिशा मिळाली. १९६७ मध्ये मद्रास अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अभियंते म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.
अणुऊर्जा आयोगाच्या ऊर्जा प्रकल्प अभियंता विभागाचे संचालक, अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष या देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक पदांवर त्यांनी काम केले.
स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका
१९८७ मध्ये अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी व अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याचवर्षी स्थापन झालेल्या अणुऊर्जा महामंडळ लिमिटेडचे ते संस्थापक व अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १८ अणुऊर्जा प्रकल्प विकसित झाले. त्यातील सात कार्यान्वित झाले. सात प्रकल्पांची बांधणी सुरू आहे, तर ४ प्रकल्प नियोजनाच्या पातळीवर आहेत. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. श्रीनिवासन यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.