

नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या नावावर काही लोक कोणत्याही मान्यतेशिवाय निधी मागत आहेत, या संबंधात विश्व हिंदु परिषदेने लोकांना सावध करतानाच पोलिसांकडेही तक्रार केली आहे.
विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी एक्सवर या संबंधात पोस्ट सादर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या नावावर फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात पडण्यापासून सावध राहा. या प्रकाराबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच केंद्रीय गृहमंत्रालय यांचेही त्वरेने कारवाई करण्यासाठी लक्ष वेधण्यात आले आहे.
बन्सल यांनी उत्तर प्रदेश पोलीस प्रमुखांना पाठवलेली तक्रार मायक्रोब्लॉगिंग साइटवर देखील शेअर केली, ज्याची प्रत आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठविली. बन्सल यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवरील दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही उत्तर प्रदेश डीजीपी, लखनऊ रेंज आयजी यांना विश्वासाच्या बाबतीत त्वरित पावले उचलण्यासाठी औपचारिक तक्रार पाठवली आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये, विहिंपने अलीकडेच म्हटले होते की, अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले, “अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरातील अभिषेक सोहळ्यासाठी निधी गोळा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आणि पावत्या छापण्याची परवानगी कोणालाही देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत समाजानेही सतर्क राहायला हवे, असे परांडे यांनी २२ डिसेंबर रोजी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते.