लाजीरवाणे कृत्य! खासदाराने नक्कल केल्यामुळे उपराष्ट्रपती भडकले, म्हणाले...

तृणमूल काँग्रेसचे(TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांची नक्कल केली, ज्यामुळे उपराष्ट्रपती संतप्त झाल्याचे पहायला मिळाले.
लाजीरवाणे कृत्य! खासदाराने नक्कल केल्यामुळे उपराष्ट्रपती भडकले, म्हणाले...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या परिसरात या निर्णयाविरोधात निदर्शने करत होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणेही धरले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे(TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांची नक्कल केली, ज्यामुळे उपराष्ट्रपती संतप्त झाल्याचे पहायला मिळाले.

उपराष्ट्रपतींनी या घटनेवर प्रतिक्रिया देत, एक खासदार नक्कल करत आहे आणि दुसरा त्याचा व्हिडिओ बनवत आहे. ही एक लाजीरवाणी, हास्यास्पद आणि कधीही न स्वीकारली जाणारी कृती असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते. मी टिव्हीवर बघीतले की, एक मोठे नेते व्हिडिओ बनवत होते, तर एक खासदार नक्कल करत होते. त्यांना सद्दबुध्दी द्यावी. काही जागा तरी निदान सोडल्या पाहिजे.

दरम्यान, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखर यांची नक्कल करत असताना राहुल गांधी हे त्यांचे चित्रीकरण करत होते. यावेळी प्रमोद तिवारी, जयराम रमेश, मनोज झा, डी राजा, कार्ती चिदंबरम सारखे जेष्ठ नेते देखील त्याठिकाणी उपस्थित होते.

भाजप म्हणते...

"विरोधी खासदारांचे निलंबन का केले असा प्रश्न देशाला पडला असेल तर त्याचे कारण येथे आहे...टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माननीय उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवली तर राहुल गांधी त्यांचा उत्साह वाढवत होते. यावरून ते सभागृहाचे किती उल्लंघन करत असतील याची कल्पना येऊ शकते!", असे ट्विट करीत भाजपने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.

13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवर विरोधी पक्षांच्या खासदारांनी दोन्ही सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली. याच मागणीला घेऊन संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांनी गोंधळ घातला. यानंतर लोकसभेच्या १३ आणि राज्यसभेच्या एका खासदाराला निलंबीत केले गेले. यानंतर १८ डिसेंबर रोजी खासदारांनी निलंबीत केलेल्या खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी, तसेच संसदेत घुसखोरी केलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पुन्हा गोंधळ घातला. यानंतर लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४६ खासदारांना संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबीत करण्यात आले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात निलंबीत केलेल्या खासदारांची संख्या ९२ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in