जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असतानाच, पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला. धनखड यांच्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर
Published on

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असतानाच, पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं. धनखड यांच्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

धनखड यांचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात धनखड म्हणाले की, “आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मी राष्ट्रपतींचे आभार मानतो, माझ्या कार्यकाळात त्यांनी मला दिलेला पाठिंबा आणि त्यांनी केलेले सहकार्य अभूतपूर्व होते. मी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांनी दिलेला पाठिंबा अमूल्य होता, माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो आहे.’’

“संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले, यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचा साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे. या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो,” असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

जगदीप धनखड यांचा प्रवास

जगदीप धनखड यांनी २०२२ मध्ये देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत धनखड यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. एकूण ७२५ पैकी ५२८ मते धनखड यांना मिळाली होती, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली होती.

जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी झुंझुनू जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांना चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. धनखड यांनी राजस्थान विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. जयपूरमध्ये राहत असताना त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली.

७० वर्षीय जगदीप धनखड यांची ३० जुलै २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बंगालचे २८ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. ते १९८९ ते १९९१ पर्यंत राजस्थानातील झुंझुनू येथून लोकसभा खासदार होते. १९८९ ते १९९१ पर्यंत धनखड हे व्ही.पी. सिंह आणि चंद्रशेखर सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीदेखील होते.

सोशल मीडियावर 'ही' नावे चर्चेत

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे देशाचे पुढचे उपराष्ट्रपती होऊ शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. कारण राज्यसभेचे कामकाज हाताळण्यात त्यांना चांगला अनुभव आहे. ते जेडीयूच्या कोट्यातून राज्यसभेचे सदस्य आहेत आणि सद्यस्थितीत जेडीयू ही एनडीएसोबत आहे. दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यानेही हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

हरिवंश नारायण सिंह यांच्यासोबतच जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचीही नावे उपराष्ट्रपतीपदासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेश निवडणुका लक्षात घेता भाजपकडून मनोज सिन्हा यांना ही मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर दुसरीकडे, बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात स्वतःचा मुख्यमंत्री देण्यासाठी नीतीश कुमार यांना उपराष्ट्रपतीपदाची ऑफर देऊ शकते, असा दावा काही विश्लेषक करत आहेत. तमिळनाडूचे राज्यपाल रवी यांचाही विचार केला जाऊ शकतो. याशिवाय, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in