
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (९ सप्टेंबर) मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी १० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजता संपेल. रालोआतर्फे सी. पी. राधाकृष्णन, तर ‘इंडिया’ आघाडीने न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. मतमोजणी सायंकाळी ६ वाजता सुरू होणार असून निकाल रात्री उशिरा जाहीर होईल.
लोकसभा व राज्यसभेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील. गुप्त मतदान पद्धतीने होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी संसद सदस्यांना पक्षाचा व्हीप बंधनकारक नसतो. मतदानाच्या वेळी खासदारांना एक मतपत्रिका दिली जाते. त्यात दोन उमेदवारांची नावे असतात. खासदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ क्रमांक लिहायचा असतो. लोकसभेचे ५४३ व राज्यसभेचे २४५ सदस्य आहेत. सध्या एकूण ७८१ मतदार आहेत, तर राज्यसभेतील सहा, तर लोकसभेतील एक जागा रिक्त आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ३९१ मतांची गरज आहे. रालोआकडे ४२५ खासदार असून विरोधकांकडे केवळ ३२४ खासदारांचे बळ आहे.
‘बीआरएस’चे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव यांनी सोमवारी सांगितले की, तेलंगणात युरिया कमी मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आम्ही निवडणुकीपासून तटस्थ राहणार आहोत. या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय असता तर आम्ही त्याचा वापर केला असता.
बिजू जनता दलाचे नेते सस्मित पात्रा म्हणाले की, ओदिशातील चार कोटी जनता ही आमच्या प्राधान्यक्रमावर आहे. ‘बिजद’चे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
बीआरएस, बिजद तटस्थ राहणार
उपराष्ट्रपतीपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) आणि नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने (बिजद) मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही आघाडीत सहभागी नाहीत.