Video : धावत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावणाऱ्याला प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल
ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करताना अचानक हातातील मोबाईल हिसकावल्याच्या अनेक घटना घडतात. सध्या गर्दीच्या ठिकाणी अशा मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. याच पद्धतीने मोबाईल चोरण्याचा प्रयत्न एका चोराला चांगलाच महागात पडलाय.
मंगळवारी बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. भागलपूर स्थानकावरून एक प्रवाशांनी भरलेली ट्रेन निघताच खिडकीजवळ बसलेल्या महिलेचा फलाटावर उभ्या असलेल्या एका चोराने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा प्रयत्न फसला. प्रवाशांनी त्याला पकडले आणि धावत्या ट्रेनमध्येच त्याला खिडकीत लटकवून ठेवले. ट्रेन धावत असतानाही त्याला तब्बल एक किमीपर्यंत लटकवून ठेवल्याचे समजते. माफी मागत सोडण्याची विनवणी करणाऱ्या चोराचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
वारंवार विनवणी, दयावया करणाऱ्या चोराचे प्रवासी काही ऐकत नाहीत. बराच वेळ लटकवल्यानंतर अखेर ट्रेनची साखळी ओढल्यानंतर ट्रेन थांबते आणि परत त्या चोराला चोप देत काहीजण मोजाहिदपूरच्या दिशेने घेऊन जातात. हे लोक त्या चोराच्याच टोळीतील असल्याची शंकाही व्यक्त होत आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओखाली चोराला जन्माची अद्दल घडवली, पुन्हा कधी चोरी करणार नाही, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
तथापि, बिहारच्या भागलपूर भागात घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये या भागात अशीच एक घटना घडली होती. यात चोर प्रवाशाचा मोबाईल हिसकावाना पकडला गेला होता. यानंतर प्रवाशांनी त्याला पाच किमीपर्यंत लटकवून ठेवले होते.