Video : "ओबीसी नाही, ओवेसी म्हणालो", 'त्या' व्हायरल व्हिडिओवर रामदेव बाबांचे स्पष्टीकरण

ओबीसी समुदायाबाबत वक्तव्य केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला
Video : "ओबीसी नाही, ओवेसी म्हणालो", 'त्या' व्हायरल व्हिडिओवर रामदेव बाबांचे स्पष्टीकरण

योगगुरू बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रामदेव बाबांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. व्हिडिओमध्ये बाबा रामदेव हे इतर मागासवर्गीय समुदायाबाबत (OBC) वक्तव्य करताना दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'मी ओबीसी नाही तर ओवेसी म्हणालो होतो', असे घुमजाव त्यांनी केले.

बाबा रामदेव यांनी ओबीसी समुदायाबाबत वक्तव्य केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर ओबीसी समुदायात तीव्र संतापाची लाट उसळली होती. रामदेव बाबा यांनी ब्राह्मण ओळख सांगून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, असे म्हटले जात होते. यानंतर प्रसारमाध्यमांनी रामदेव बाबा यांना याबाबत विचारणा केली. यावर त्यांनी, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगितले.

"मी 'ओवेसी' म्हणालो, 'ओबीसी' नाही." त्यांचे पूर्वज(ओवेसींचे) देशद्रोही होते. मी त्यांना गांभीर्याने घेत नाही", असे स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिले आहे.

काय होता व्हायरल व्हिडिओ?

या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा स्वत:ला अग्निहोत्री ब्राह्मण' तसेच, विविध ब्राह्मण गोत्रांचे असल्याचे संबोधतात. "माझे मूळ गोत्र ब्रह्मगोत्र आहे. मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे. मी वेदी ब्राह्मण, द्विवेदी ब्राह्मण, त्रिवेदी ब्राह्मण, चतुर्वेदी ब्राह्मण आहे. मी चार वेद वाचले आहेत." असे योगगुरू म्हणाले आहेत. य़ावेळी, त्यांनी ओबीसींबद्दल अवमानकारक वक्तव्यही केल्याचे समजत होते.

दरम्यान, रामदेव बाबा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर अनेक लोकांनी '#boycottpatanjali' हा हॅशटॅग वापरून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करायला सुरुवात केली होती.

logo
marathi.freepressjournal.in