Judge Cash Case : जळालेल्या नोटांचे Video सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड; न्या. वर्मा यांच्या अडचणीत वाढ!

न्या. यशवंत वर्मा यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी बेहिशोबी रोख रक्कम मिळाल्याच्या आरोपाशी संबंधित अहवाल, फोटो व जळालेल्या नोटांचे व्हिडीओ सुप्रीम कोर्टाने आपल्या वेबसाइटवर अपलोड केले.
Judge Cash Case : जळालेल्या नोटांचे Video सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड; न्या. वर्मा यांच्या अडचणीत वाढ!
Published on

नवी दिल्ली : न्या. यशवंत वर्मा यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी बेहिशोबी रोख रक्कम मिळाल्याच्या आरोपाशी संबंधित अहवाल, फोटो व जळालेल्या नोटांचे व्हिडीओ सुप्रीम कोर्टाने आपल्या वेबसाइटवर अपलोड केले. अंतर्गत चौकशीचा निष्कर्ष व न्या. वर्मा यांनी आरोपाचा केलेला इन्कार तसेच न्या. वर्मा यांच्यावरील कारवाईबाबतचा खुलासा बेवसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना व दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांचा एक व्हिडीओ जारी केला. यात १४ मार्च रोजी न्या. वर्मा यांच्या घरी जळालेल्या कथित रोख रकमेचा खुलासा केला गेला. आता न्या. वर्मा यांची सखोल चौकशीची शक्यता आहे.

सरन्यायाधीशांचे तीन प्रश्न

सरन्यायाधीश खन्ना यांनी शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना न्या. वर्मा यांच्याकडून तीन प्रश्नांची उत्तरे मागवण्याचे आदेश दिले. प्रश्न पहिला - न्या. वर्मा हे आपल्या परिसरातील कॅमेऱ्यात पैसे किंवा रोख रकमेचा हिशोब कसा घेतात? दुसरा प्रश्न - खोलीत मिळालेल्या पैशाचा स्रोत काय? तिसरा प्रश्न - १५ मार्च २०२५ रोजी सकाळी खोलीतून जळालेल्या नोटा कोणी काढल्या होत्या.

सरन्यायाधीशांना पाठवलेल्या आपल्या अहवालात मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, दिल्ली पोलीस प्रमुख अरोरा यांनी १४ मार्च रोजी रात्री न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी कथित आगीची घटना व रोख रक्कम मिळाल्याचा व्हिडीओ जारी केला. हा व्हिडीओ दाखवल्यावर पैशाचा स्रोत व सरकारी बंगल्यात ते सापडल्याबद्दल त्यांना विचारणा केली असता न्या. वर्मा म्हणाले की, ‘माझ्याविरोधात कट केल्याचा संशय आहे’ त्यावर दिल्लीच्या मुख्य न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला की, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

सरन्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांना हायकोर्टाचे रजिस्ट्रीचे कर्मचारी, सुरक्षा अधिकारी व गेले सहा महिने न्या. वर्मा यांच्या बंगल्यावर तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांची माहिती काढण्यास सांगितले आहे. तसेच न्या. वर्मा यांच्या अधिकृत व अन्य मोबाइल क्रमांकावरून केलेल्या फोनचा तपशील कंपन्यांकडून मागवण्यास सांगितले. मोबाइल फोन टाकून देऊ नये किंवा संदेश किंवा अन्य माहिती रद्द करू नये, असा सल्ला न्या. वर्मा यांना देण्यास सांगितले.

याच्या उत्तरात दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, कॉलचे सर्व तपशील मिळाले आहेत. या पत्रासोबत एक पेन ड्राइव्ह पाठवत आहे. ‘आयपीडीआर’ संबंधातील माहिती दिल्ली पोलीस व मोबाइल कंपनीकडून मिळेल ती तुम्हाला तत्काळ कळवली जाईल.

मी निर्दोष, न्या. वर्मा यांचा खुलासा

याप्रकरणी स्वत:ला निर्दोष म्हणताना न्या. वर्मा यांनी सांगितले की, मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही स्टोअर रूममध्ये रोख रक्कम ठेवली नाही. या स्टोअर रूममध्ये रोख रक्कम ठेवल्याचा आरोप चुकीचा आहे. सरकारी बंगल्यात किंवा खुल्या ठिकाणी असलेल्या स्टोअर रूममध्ये रोख रक्कम ठेवेल, यावर कुणीही विश्वास ठेवणे अविश्वसनीय आहे. माझ्या घराच्या परिसरात रोख रकमेचा व्हिडीओ पाहताना मला विश्वासच बसत नव्हता.

कारण घटनास्थळी जे नव्हते, तेच त्यात दाखवले गेले होते. हे प्रकरण मला फसवण्याचे किंवा माझी बदनामी करण्यासाठी रचले होते, हे यातून स्पष्ट होते.

logo
marathi.freepressjournal.in