'स्मशान शांतता', असे वाक्य आपल्याकडे बऱ्याचदा ऐकायला मिळते. त्याला कारण देखील तसेच आहे. स्मशान म्हटले म्हणजे भयाण शांतता, भयभीत करणारे वातावरण. नुसत्या नावानेच अंगावर काटा येतो. अनेकांना स्मशानात जायला भीती वाटते. अशात आपल्याला कोणी स्मशानात जाऊन रात्रभर झोपायला सांगितले तर? खरे तर याचा विचार देखील करवत नाही. मात्र, उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक वृद्ध स्मशानात जळत असलेल्या चितेच्या शेजारी झोपलेला दिसत आहे. तो असे का करतोय, याचे कारण ऐकले तर तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कोहना भागात असलेल्या भैरवघाटचा असल्याचे सांगितले जात आहे. यात एक वृद्ध स्मशानात जळत असलेल्या चितेच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ 29 डिसेंबरच्या रात्रीचा असल्याची माहिती आहे. सचिन गुप्ता नावाच्या 'एक्स'हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या वृद्धाचा व्हिडिओ काढणाऱ्या लोकांनी त्याला जळत्या चितेच्या बाजूला झोपण्याचे कारण विचारले. यावेळी त्या वृद्धाच्या उत्ताराने तुम्हाला अस्वस्थ वाटल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडीने गारठलाय. कानपूरमध्ये तर पारा आठ डिग्रीपर्यंत खाली आलाय. अशा हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत जिथे रात्रीच्या वेळी खिशातला हात बाहेर काढायची इच्छा होत नाही तिथे या वृद्धाकडे निवारा नाही. त्याच्याकडे फक्त एक पातळ चादर आहे. त्यामुळे स्वत:चे थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी जळत्या चितेच्या बाजूला झोपल्याचे त्याने सांगितले. निराधार आणि गरजूंचा हा व्हिडिओ सरकारने देखील बघायला हवा, असे पोस्टकर्त्याने म्हटले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.