व्हिएतनाम : निसर्ग सौंदर्याची खाण

देशाला लाभलेले मोठ्या प्रमाणावरील स्वच्छ समुद्रकिनारे, नद्या आणि पर्वतीय निसर्गसौंदर्याचे मार्केटिंग करून देशातील तरुणांना, नागरिकांना उपलब्ध कसा करता येईल हेही त्यामागचे उद्दिष्ट
व्हिएतनाम : निसर्ग सौंदर्याची खाण

अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राबरोबर १९५४ मध्ये सुरू झालेले युद्ध तब्बल १९ वर्षे सुरु होते.  २६ कोटी क्लस्टर बॉम्ब टाकल्यानंतरही समर्थपणे झुंज देऊन  १९७८ मध्ये अमेरिकेला माघार घ्यायला लावणारे छोटे राष्ट्र म्हणजे व्हिएतनाम. या युद्धात तीस लाखांहून अधिक सैनिक ठार झाल्यानंतरही हे राष्ट्र खचून गेले नाही. सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम हे राष्ट्र गेल्या काही वर्षात उद्योग क्षेत्रात नव्याने भरारी घेत आहे. या देशाने पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. देशाला लाभलेले मोठ्या प्रमाणावरील स्वच्छ समुद्रकिनारे, नद्या आणि पर्वतीय निसर्गसौंदर्याचे मार्केटिंग करून देशातील तरुणांना, नागरिकांना उपलब्ध कसा करता येईल हेही त्यामागचे उद्दिष्ट. सिंगापूर, दुबई, मलेशिया, थायलँड या देशांशिवाय नवा पर्याय पर्यटकाना उपलब्ध करून देण्याचा निर्णय व्हिएतनाम सरकारने घेतला आहे.  

व्हिएतनामच्या द नांग शहराला व्हिएतजेट कंपनीची थेट विमानसेवा सुरु झाली आहे. या शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर बाणा हिल परिसर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० किलोमीटर अंतरावरील या परिसरात जाण्यासाठी पाच वर्षापासून केबल कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. केबल कारने आपण अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बाणा हिलवर पोहोचतो. थोडे चालल्यानंतर भव्य पुलाजवळ आपण पोहोचतो, तो हाच गोल्डन ब्रिज. विशेष म्हणजे नावाप्रमाणे सुवर्ण झळाळी असल्याने आपल्या पर्यटनाची सुवर्ण नोंद आपल्या मनाच्या पटलावर नक्कीच होते. हा पूल दोन भव्य हाताच्या आकाराच्या खांबांवर उभारलेला. आधुनिक काळातील आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुनाच म्हणायाला हवा. या गोल्डन ब्रिजवर जगभरातील पर्यटकांची गर्दी होत असते. आम्ही या पुलावर पोहोचलो असता कडक ऊन होते. आणखी थोडे चालल्यानंतर जणू काही ढगांच्या राज्यात पोहोचल्याचा आनंद झाला. काही वेळातच पर्जन्यवृष्टी सुरु झाली. गारेगार वातावरणात पुलावर फिरत असतानाच पर्वतीय क्षेत्रातील रम्य वातावरण पाहताना मन ‘चिंब’ होते. दिवसभरात ऊन, पाऊस आणि थंडी या तीनही ऋतूंचा अनुभव देणारा हा परिसर जगभरातील एकमेव ठिकाण आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे या पुलावर मराठी आवाज कानावर पडला. नागपूरवरून आलेल्या या तरुणांची  भेट झाल्यानंतर आपसूकच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची घोषणा गोल्डन ब्रिजवर आणि बाणा हिल परिसरात घुमल्याचा आनंद काही वेगळाच. बाणा हिलवरील फ्रेंच सिटी येथे असलेल्या पुरातन इमारती फ्रान्सच्या जुन्या काळातील स्थापत्य कलेचा अनुभव देणाऱ्या आहेत. या इमारती जास्तीतजास्त लाकडाचा वापर करण्यात आला आहे. १५०० फुट उंचीवर गोल्डन हॉर्स, फुलांची बाग ही सर्व रम्य ठिकाणे पाहणे अद्भुतच... विशेष म्हणजे सन वर्ल्ड एन्टरटेन्मेंट ब्रांडने हे स्थळ विकसित केले आहे. पर्यटनातून विकासाच्या त्यांच्या दृष्टीचे कौतुक आहे. कारण जगभरात बहुतांश देशात पर्वतीय प्रदेश आहेत. निसर्ग आणि दृष्टी यांचा मिलाफ झाला की डोंगर न फोडताही विकास करता येतो याचे हे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले गेले आहे.  

होए आन हे पुरातन काळात सोळाव्या आणि सतराव्या शतकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होते. या शहरातील नदीवर बांधलेला जपानी पूल हा लाकडी असून अद्याप मजबूत आहे. या पुलाजवळ अनेक विक्रेते आहेत. तेथे एक वयस्कर फेरीवाली महिला केळी विकत होती. तिला वय विचारले असता तिने हाताच्या बोटांनी वय सांगितले. एका हाताचे पाच बोटे आणि दुसऱ्या हाताचे चार बोटे म्हणजे तिचे वय तब्बल ९० होते. या वयाची अनेक वृद्ध अथंरुणाला खिळलेली असताना आजीबाई केळी विकत होत्या. द नांग शहरापासून ७० किलोमीटर आणि होए आन शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर माय सन पुरातन परिसर आहे. माय सन परिसराला युनेस्कोने हेरिटेजचा दर्जा दिला आहे. या परिसरात आजही हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात. चौथ्या शतकात सयाम राजाने दगडी बांधकामात बांधलेले शिव मंदिर वैभवशाली काळाची आठवण करून देते. तेथील लोक या सयाम राजाला चाम किंग म्हणूनही ओळखतात. या भागात शंकर,  विष्णू, पद्मानाभ, शिवाचे गण, गणेश, कार्तिकेय स्वामी यांच्या दगडी मूर्ती आहेत. हा परिसर जुन्या काळातील वैभवाची साक्ष देतो. हजारो वर्षांपासून ऊन-पावसात, वादळवारे झेलत आणि फ्रेंच -अमेरिका यांच्या हल्ल्यात शिवमंदिराची मोठी हानी झाली. हे लक्षात घेऊन भारत सरकारच्या पुरातत्व खात्यानेही या परिसरातील मंदिर जतनासाठी प्रयत्न केले आहेत. चाम राजाने बांधलेल्या पुरातन शिवमंदिरातील शंकराची मूर्ती, शिवलिंग व अन्य देवतांच्या मूर्ती भग्नावशेष अवस्थेत असल्या तरी या मूर्ती दा नांग शहरातील संग्रहालयात व्हिएतनाम सरकारने जतन केल्या आहेत. द नांगच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या चाम स्कल्पचर संग्रहालयात हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आणि बौद्ध काळातील दोन हजारांहून मूर्ती जतन करून ठेवल्या आहेत. द नांग शहरातून वाहणाऱ्या हॅन नदीवरील सहाही पूल आकर्षक आहेत. या संग्रहालयाशेजारील नदीवर ड्रॅगनच्या आकाराचा भव्य पूल आहे. तेथेही नाईट लाईफ सुरु झाले आहे. या नदीतील बोटीत संगीतमय वातावरणात पर्यटक मद्याचे सेवन करून आनंद लुटतात. या बोटीतून ड्रॅगन पुलावरील ड्रॅगनच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा पाहाणे फँटसी दुनियेत घेऊन जाते. दर शनिवार, रविवारी या फँटसी दुनियेचा आनंद घेता येतो.

होए आन शहराजवळील थू बाँन नदी किनाऱ्यावर सायंकाळी सादर होणारा मेमरी शो व्हिएतनामी संस्कृती, परंपरा यांची माहिती देणारा आहे. भव्य गणेशमूर्ती, हत्ती, चाम राजाच्या काळातील विवाह सोहळ्याचे नाट्य रूपांतरण, अप्रतिम नृत्य हे या शोचे वैशिष्ट्य. सुमारे पाचशे कलाकार असलेलला एक तासापेक्षा जास्त वेळ सादरीकरण असलेला हा भव्य दिव्य शो प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतो़. होए आन मेमरी शो मंगळवार वगळता आठवडाभर संध्याकाळी साडेसात ते ८.४५च्या दरम्यान सादर होतो. होए आन शहराजवळील बिन वंडर हे  रिसॉर्ट थीम पार्क. तेथील पोपटांचा पार्क म्हणजे भलामोठा नैसर्गिक पिंजरा. त्याच्या १५ फुट उंच प्रवेश द्वारावरील वजनदार लोखंडाच्या साखळ्या बाजूला करुन आत जावे लागते. भारतात आपण छोट्या आकाराचे हिरवे पोपट पाहतो. परंतु येथे बहुरंगी आणि आकाराने मोठे पोपट पाहताना भान हरखून जाते. तेथील रिव्हर सफारी अर्थात कृत्रिम नदीतील  बोटीतून फिरताना नदीच्या दोन्ही बाजूकडे भू प्रदेशात वाघ, सिंह, हत्ती अशा जंगली प्राण्यांना पाहताना अभयारण्यात गेल्याचा आनंद मिळतो.

व्हिएतनाममध्ये विमानाने आल्यानंतर द नांग, हुआन, हुए या शहरांमध्ये रस्ता मार्गे बस, कारने पोहचू शकतो. हुए शहरातील मार्केटमध्ये गेलो असता एकूण मार्केटची ठेवण पाहता मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट्ची आठवण झाली. होए आन शहरातील इमारती आणि आखीव रस्ते पाहता व्हिएतनामवरील फ्रेंच राज्यकर्त्यांचा प्रभाव दिसून येतो. हुए आन शहर प्रसिद्ध सीटाडेल राजवाडा आणि आयकॉनिक पागोडा यासाठी प्रसिद्ध आहे

द नांग शहरात विनय शुक्ला हा तरुण भेटला. व्हिएतनामने उद्योगवाढीला चालना देण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर अनेक भारतीय नोकरी, व्यवसायासाठी तेथे स्थालातरित झाले आहेत, होत आहेत. विनयने पाच वर्षापूर्वी द नांग शहरात रेस्तौरांत सुरु केले. कोरोनाचा फटका बसल्याने रेस्टॉरंट पुन्हा सुरु करत आहेत. सध्या तो तेथे भारतीय मसाल्याची विक्री करत आहे. द नांगच्या समुद्रकिनाऱ्यावर हरयाणाचा शेतकरी कुटुंबातील एक तरुण भेटला. तो तेथे व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील हॉटेल्समध्ये भारतीय अन्नपदार्थ उपलब्ध करुन दिल्यास आणि हिंदी चित्रपटसृष्टीला सवलती दिल्यास मोठ्या प्रमाणावर शुटींग होऊन जगभर  व्हिएतनामच्या पर्यटनस्थळनचा प्रचार होईल, असे मत भारताचे उप-राजनैतिक अधिकारी सुभाष गुप्ता यांनी मांडले.  

फ्रेंच राज्यकर्त्यांची वसाहत असलेले आताचे व्हिएतनाम १८०० ते १९५४ पर्यंत फ्रेंच इंडो चायना म्हणून ओळखले जात होते. फ्रेंच, जपानी कंबोडियन, चिनी नागरिक व्हिएतनाममध्ये स्थायिक झाले आहेत आणि ते व्हिएतनामी नागरिक म्हणून स्वतःची  ओळख अभिमानाने सांगताना दिसले. तेथील नागरिक बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम धर्माचे असून ते गुण्यागोविंदाने राहात आहेत. त्यांच्यात संघर्ष होत नाही, असे तेथील नागरिकांना बोलते केले असता त्यांनी सांगितले. तेथील नागरिकांचे धर्म आणि संस्कृती भिन्न असली तरी ते परस्परांशी आपुलकीने- प्रेमाने राहात आहेत. ६० वर्षांचा सायकल रिक्षावाला, ९० वर्षांची केळी विकणारी आजीबाई, पुरुषांबरोबर तरुणी, महिला घराच्या चार भिंतीत न राहता पर्यटन, हॉटेल, अन्य उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. सरकारचे उद्योग-व्यवसाय क्षेत्राला असलेला पाठिंबा पाहता देशाचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी व्हिएतनामी प्रयत्नशील आहेत.

आर्थिकदृष्ट्या व्हिएतनाम सशक्त नसल्याने त्यांचे चलन डॉन्गचे मूल्य मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहे. एका रुपयाला साधारण ३०० डॉन्ग मिळतात. त्यामुळे व्हिएतनामची सहल युरोप, अमेरिका, दुबई, सारखी महागडी नाही. तेथील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे कंदिल. आपणही दिवाळीला एक कंदिल घराबाहेर लावतो, तो आनंद व्यक्त करण्यासाठी. मात्र, व्हिएतनामी लोक त्यांच्या घरात, घराबाहेर आणि हॉटेल, रेस्टॉरंटच्या आत आणि बाहेर ५०, १०० कंदिल लावून आनंद व्यक्त करतात. त्यांचा हा उत्साह नक्कीच पर्यटकांनाही आनंद देणारा आहे. जगभरात विविध देशांमध्ये भटकंती करणाऱ्या भारतीय पर्यटकांनीही निसर्गसौंदर्याची खाण असलेल्या व्हिएतनामला एकदा तरी भेट देऊन आनंद मिळवायला हरकत नाही.

logo
marathi.freepressjournal.in