

चेन्नई: तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेची शनिवारी संध्याकाळी अखेर झाली. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष आणि सुपरस्टार सी. जोसेफ विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी पाचारण करण्यात आले आहे. रविवारी, १० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सोहळा पार पडणार असून विजय यांच्यासोबत अन्य ९ मंत्रीही शपथ घेणार आहेत.
विधानसभा सभागृहात १३ मे पर्यंत विजय सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बऱ्याच राजकीय घडामोडींनंतर व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. २३४ सदस्य संख्या असलेल्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. विजय यांनी १२० नवनिर्वाचित आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केले आहे. पक्षांनुसार टीव्हीके १०७, काँग्रेस ५, सीपीआय २, माकप २, व्हीसीके २, आययूएमएल २, एकूणः १२० असे संख्याबळ आहे.
राज्यपालांची ४ दिवसांत ४ वेळा भेट
गेल्या चार दिवसांत विजय यांनी राज्यपालांची ही चौथी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस, व्हीसीके, सीपीआय (एम), सीपीआय आणि आययूएमएल या मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. यापूर्वी राजकीय अस्थिरतेच्या भीतीने काँग्रेसच्या आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले होते, मात्र आता पाठिंब्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.