तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३३ जणांचा मृत्यू; ५० जखमी

तमिळनाडूच्या नमक्कल येथे अभिनेता विजय याच्या रॅलीत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक बालकांचा समावेश आहे.
तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३३ जणांचा मृत्यू; ५० जखमी
Published on

चेन्नई : तमिळनाडूच्या नमक्कल येथे अभिनेता विजय याच्या रॅलीत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक बालकांचा समावेश आहे.

तमिलगा वेट्री कझगम या पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्या रॅलीत हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. गर्दी इतकी वाढली की परिस्थिती बिघडू लागली. अभिनेत्याचा नेता बनलेले विजय हे जनतेला संबोधित करत होते. तेव्हा गर्दीतील काही जण बेशुद्ध पडले. त्यानंतर आपले भाषण अर्ध्यावर टाकून ते रॅलीतून निघाले.

गर्दी एवढी वाढली की, लोकांना श्वास घेणे अवघड बनले. त्यामुळे अनेक लोक व कार्यकर्ते बेशुद्ध झाले. विजय यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन केले. जखमींना मदत करून त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेला असून ५० जणांवर उपचार सुरू आहेत. करूर येथे तिरुची येथून २४ डॉक्टर व सालेमहून २० डॉक्टरांना पाचारण केले आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी सांगितले की, माजी मंत्री व्ही. सेंथीलबालाजी व आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ जखमींवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच तिरुची अनबिल महेश यांना युद्धपातळीवर मदत करण्यास सांगितले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना परिस्थिती सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेने व डॉक्टरांनी या दुर्घटनेप्रकरणी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री स्टलिन यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in