विक्रमने मारली चंद्रावर उडी - आता २२ सप्टेंबरपर्यंत घेणार झोप

प्रज्ञान आणि विक्रमने पाठवलेल्या माहितीचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे
विक्रमने मारली चंद्रावर उडी - आता २२ सप्टेंबरपर्यंत घेणार झोप

बंगळुरू : भारताने चंद्रावर पाठवलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपले काम चोखपणे बजावले आहे. सध्या चंद्रावर रात्र सुरू झाली असल्याने दोघांनीही झोप सुरू केली असली, तरी तत्पूर्वी विक्रमने एक महत्त्वाचा प्रयोग पार पाडला. त्याने चंद्रावर लहानशी उडी मारली.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने या प्रयोगाची नेमकी तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही, मात्र विक्रम लँडरवरील लहान रॉकेट्स काही काळ प्रज्वलित करून ते चंद्राच्या पृष्ठभागापासून वातावरणात ४० सेंटिमीटर वर उचलले आणि त्याच्या मूळ जागेपासून ३० ते ४० सेंमी अंतरावर पुन्हा उतरवले. वरकरणी पाहता ही लहान वाटणारी कृती पुढील संशोधन आणि मोहिमांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मोहिमेत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काम संपल्यानंतर चंद्रावरच राहणार आहे. मात्र, भविष्यातील मोहिमांमध्ये जेव्हा चंद्रावरून तेथील माती-दगडांचे नमुने पृथ्वीवर आणायचे असतील किंवा तेथे अंतराळवीर पाठवून त्यांना परत आणायचे असेल, तेव्हा यान चंद्रावरून पुन्हा उड्डाण घेते की नाही, याची त्यातून चाचणी घेण्यात आली.

हा प्रयोग करत असताना विक्रमवरील उपकरणे दुमडून बंद केली होती. उडी मारून झाल्यावर ती पुन्हा उघडण्यात आली. आता चंद्रावर रात्र होऊन अंधार पडल्याने विक्रम आणि प्रज्ञान स्लीप मोडमध्ये गेले आहेत. त्यांच्या सौरघटांवर उजेड पडत नसून त्यांचे चार्जिंग होणे बंद झाले आहे. चंद्रावर २२ स्पटेंबरला पुन्हा सूर्य उगवून दिवस सुरू होईल. तेथे पृथ्वीवरील १४ दिवस उजेड असतो. त्या काळात प्रज्ञान आणि विक्रम पुन्हा जागे होऊन काम करतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, प्रज्ञान आणि विक्रमने पाठवलेल्या माहितीचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in