
भाजपने मंगळवारी पश्चिम बंगालच्या ममता सरकारविरोधात कोलकात्यात मोर्चा काढला. या मोर्चाला ‘नबन्ना अभिजन मार्च’ (चलो सचिवालय) असे नाव देण्यात आले होते. पोलिसांनी भाजपच्या मार्चला सचिवालयाकडे जाण्यापूर्वीच अडवले व भाजप नेते सुवेंदू अधिकारी, लॉकेट चॅटर्जींसह अनेक नेते व कार्यकर्त्याना ताब्यात घेतले. यामुळे भाजपचे कार्यकर्ते भडकले व त्यांनी कोलकाताच्या लालबाजार भागात पोलिसांच्या वाहनाची जाळपोळ केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या व पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. यावेळी झालेल्या दगडफेकीत व झटापटीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. भाजप नेते मीनादेवी पुरोहित व स्वपन दासगुप्ता हेही यावेळी जखमी झाले.
सांतरागाछी रेल्वे स्थानकाजवळ विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जींसह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अधिकारी म्हणाले, ‘बंगालच्या जनतेने ममतांची साथ सोडली आहे. त्यामुळे त्या राज्यात उत्तर कोरियासारखी हुकूमशाही राबवत आहेत.’ दुसरीकडे, दिलीप घोष यांनीही बंगाल पोलिसांवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसारखे वागत असल्याचा आरोप केला.
कॉलेज स्कॉयडलगत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांत जोरदार चकमक झाली. या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी शांतीपूरमध्ये रेल्वेत अर्पिता व पार्थ चॅटर्जी यांचे पोस्टर फडकावले. या पोस्टरवर ‘चोर’ लिहिले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांतो मजुमदार यांना कोलकाता पोलिसांनी हावडा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.
तीन बाजूंनी घेरण्याची योजना
भाजपने नबन्नला तीन बाजूने घेरण्याची योजना आखली होती. हावडा रेल्वे स्थानकावर सुकांतो मजुमदार, सांतरागाछीतून सुवेंदू अधिकारी व स्कॉयडहून दिलीप घोष हे नबन्नला जाणार होते; पण पोलिसांनी या तिघांनाही रोखले. या नेत्यांच्या अटकेसाठी बंगाल पोलिसांनी स्पेशल फोर्स तैनात केली होती.