
केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केल्यानंतर बिहार आणि राजस्थानमध्ये त्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन करीत दगडफेक केली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन करण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक अडवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या.
संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लावली. योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये ‘भारतीय लष्कराचे चाहते’ असा बॅनर घेतला होता. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतले जाणार असल्याने चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांकडून दगडफेक होत असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी जाळपोळही केली. बक्सर जिल्ह्यात रेल्वेमार्गावर उतरत तरुणांनी जनशताब्दी एक्स्प्रेस ३० मिनिटांसाठी रोखली होती. दुसरीकडे जयपूरमध्ये १५० लोकांनी अजमेर-दिल्ली हायवे रोखला. पोलिसांनी १० आंदोलकांना अटक केली आहे.
तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका - राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘अग्निपथ’ योजनेला विरोध केला असून तरुणांच्या भविष्याशी खेळू नका, असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अग्निपथ योजनेला विरोध करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. “दोन वर्षांपासून सरळ भरती करण्यात आलेली नाही. चार वर्षानंतर युवकांचे भविष्य अस्थिर होईल. तसेच या काळात कोणताही रँक मिळणार नाही. तसेच कोणतेही पेन्शनदेखील मिळणार नाही. सरकारकडून संरक्षण दलाचा सन्मान केला जात नाही,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच देशातील बेरोजगार युवकांचे म्हणणे ऐकायला हवे. त्यांना अग्निपथावर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊन नका, असा इशारादेखील राहुल गांधी यांनी दिला आहे.