इम्फाळ : मैतेई आणि कुकी-झो यांच्यातील वांशिक संघर्षामुळे गेल्या जवळपास दोन वर्षांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला. मणिपूर-आसाम सीमेवरील जिरी आणि बराक नद्यांच्या काठांवर शुक्रवारी रात्री सहा बेपत्ता व्यक्तींपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून त्यामध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. संतप्त निदर्शकांनी मणिपूरमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरांवर जोरदार हल्ला चढविला आणि जिरिबाम जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या तीन व्यक्तींना न्याय देण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे प्रशासनाला तेथे दुपारपासून संचारबंदी जारी करणे भाग पडले.
संतप्त जमावाने आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यामुळे इम्फाळ पश्चिम प्रशासनाने तेथे बेमुदत कालावधीसाठी संचारबंदी जारी केली. आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री सपम रंजन यांच्या सनाकेईथेल परिसरातील लामफेल येथील निवासस्थानावर जमावाने हल्ला केला. जिरिबाम जिल्ह्यात तीन व्यक्तींची हत्या झाली तो प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्याचे आश्वासन रंजन यांनी दिले असून जनतेच्या भावनांची कदर न झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे, असे विकास प्राधिकरणाचे प्रतिनिधी डेव्हीड यांनी सांगितले. जमावाने सार्वजनिक वितरणमंत्री एल. सुसिंद्रो सिंह यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला.
त्यानंतर भाजपचे आमदार आर. के. इमो यांच्या निवासस्थानबाहेर जमाव एकत्र झाला आणि त्यांनी तीन व्यक्तींच्या हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची आणि आरोपींना २४ तासांमध्ये अटक करण्याची मागणी केली. इमो हे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचे जावई आहेत. तेथून निदर्शकांनी आपला मोर्चा केईशामथोंग येथील अपक्ष आमदार सपम निशिकान्त सिंह यांच्या निवासस्थानाकडे वळविला. आमदार घरामध्ये नसल्याचे निदर्शकांना सांगण्यात आल्याने संतप्त झालेल्या निदर्शकांनी सिंह यांच्या मालकीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयाच्या इमारतीबाहेर बांधण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकामही निदर्शकांनी तोडले.
काँग्रेसची टीका
दरम्यान, हिंसाचारग्रस्त मणिपूरला जाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप काँग्रसने केला आहे. मोदी नित्यनियमाने परदेशात सहलीला जातात मात्र ते मणिपूरला जाण्याचे का टाळतात ते अनाकलनीय आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
पोलिसांचा लाठीमार
सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या १० बंडखोरांचे मृतदेह सिल्वर वैद्यकीय महाविद्याल रुग्णालयात आणण्यात आले असून ते मृतदेह ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांच्या नातेवाईकांची सुरक्षा दलांसमवेत चकमक उडाली. त्यामुळे त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयाबाहेर लाठीमार केला. ठार झालेल्या बंडखोरांचे मृतदेह मणिपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येतील आणि पुढील कारवाई मणिपूर पोलीस करतील असे सांगण्याचा प्रयत्न या वेळी पोलिसांनी केला.
गृह मंत्रालयाचे आदेश
दरम्यान, राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावी, असा आदेश गृह मंत्रालयाने मणिपूरमध्ये तैनात करण्यात आलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांना दिला आहे. मणिपूरमधील स्थिती अत्यंत नाजूक आहे, दोन्ही समाजातील सशस्त्र दंगलखोर हिंसाचार घडवत आहेत आणि त्यामुळे निष्पापांचे हकनाक बळी जात आहेत, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, असा आदेशही देण्यात आला आहे.