

विशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सचे आहे. आपली बहुतांशी कामे मानव आता यंत्रमानवाकडून करून घेऊ लागला आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय रेल्वेनेही आपल्या कामात यंत्रमानवाचा वापर करायला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मानवरूपी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात केला आहे.
भारतीय रेल्वेच्या पूर्व किनारपट्टी भागात प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी ‘एएससी अर्जुन’ हा मानवरूपी (ह्युमनॉइड) यंत्रमानव कार्यान्वित करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिपत्याखाली हा यंत्रमानव तैनात करण्यात आला आहे.
आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तन मोहिमेचा तो एक भाग आहे. यामागील उद्देश सुरक्षा यंत्रणा बळकट करणे आणि प्रवाशांना अधिक प्रभावी सहाय्य देणे हा आहे.
‘प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर हा मानवरूपी रोबोट तैनात करून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे ‘आरपीएफ’चे महानिरीक्षक आलोक बोहरा यांनी सांगितले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक ललित बोहरा यांनी सांगितले की, हा यंत्रमानव प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) कनेक्टिव्हिटी आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग क्षमतेने सुसज्ज आहे. त्यामुळे तो ‘आरपीएफ’ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांसाठीही एक स्मार्ट सहाय्यक म्हणून काम करतो. ‘एएससी अर्जुन’ची रचना सुरक्षा पाळत ठेवणे, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेचे निरीक्षण आणि सुरक्षिततेविषयी जनजागृतीसाठी करण्यात आली आहे. यामुळे मनुष्यबळावरील ताण कमी होऊन तो वेगाने प्रतिसाद देतो. हा मानवरूपी यंत्रमानव पूर्ण स्वदेशी बनावटीचा आहे. तो विशाखापट्टणम येथेच डिझाइन आणि विकसित करण्यात आला असून, वरिष्ठ रेल्वे व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आरपीएफ’च्या पथकाने वर्षभराहून अधिक काळ त्यावर काम केले आहे.
‘एएससी अर्जुन’ची ओळख करून देणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत रेल्वे सुरक्षा बळकट करण्याच्या, प्रवाशांचा अनुभव सुधारण्याच्या आणि कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने ‘वाल्टेअर’ विभागाचे एक अग्रगण्य पाऊल असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बोहरा यांनी नमूद केले. सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासीस्नेही रेल्वे परिसंस्था उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना स्वीकारण्यास भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रवाशांशी साधणार संवाद
या यंत्रमानवाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये चेहरा ओळख प्रणालीद्वारे घुसखोरी शोधणे, एआय-आधारित गर्दी घनता विश्लेषण, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये बहुभाषिक सार्वजनिक घोषणा, तसेच अडथळे टाळत अर्धस्वायत्त पद्धतीने प्लॅटफॉर्मवर गस्त घालण्याची क्षमता यांचा समावेश आहे. याशिवाय, एकात्मिक डॅशबोर्डच्या माध्यमातून रिअल-टाइम परिस्थितीची जाणीव, आग व धूर ओळखून तत्काळ इशारे देणे, तसेच मैत्रीपूर्ण हालचाली आणि माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमताही या यंत्रमानवात आहे.