
विश्व हिंदू परिषदेने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. शर्मा यांचे विधान योग्य की अयोग्य, हे न्यायालय ठरवेल, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटले आहे. “या सर्व घटनेवर न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता देशभरात हिंसक आंदोलन करण्यात येत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे,” असेही आलोक कुमार यांनी सांगितले.
“न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता देशभरात हिंसक निदर्शने होत आहेत, कायदा त्याला परवानगी देतो का? उघडपणे बोलले जात आहे की, कोणी पैगंबरांबद्दल चुकीचे बोलत असेल, तर त्या व्यक्तीची जीभ कापली जाईल. अशी विधाने लोकांकडून केली जात असून, लोक कायदा हातात घेत आहेत, ही बाब देशासाठी चिंतेची आहे,” असे अलोक कुमार यांनी म्हटले आहे. प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर देशभरातून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत चौकशीला
हजर राहण्याचे आदेश
वादग्रस्त वक्तव्यामुळे नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून, याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा यांना समन्स बजावले आहे. तसेच २२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.