नवी दिल्ली : दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे सात जागांसह सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ५८ मतदारसंघात शनिवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यात मतदान झाली आहे. पश्चिम बंगालमधील जंगल महाल या आदिवासी पट्ट्यातही मतदान होत आहे.
दिल्लीतील सात जागांसह उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, ओदिशातील सहा, झारखंडमधील चार आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी शनिवारी मतदान होणार आहे. त्याचबरोबर ओदिशातील विधानसभेच्या ४२ जागांसाठीही मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने १.१४ लाख मतदान केंद्रांवर ११.४ लाख निवडणूक अधिकारी तैनात केले आहेत.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राव इंद्रजित सिंह आणि कृष्णपाल गुर्जर, भाजपच्या मनेका गांधी, संबित पात्रा, मनोहरलाल खट्टर आणि मनोज तिवारी तर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, काँग्रेसचे दीपेंद्रिसंग हुडा, राज बब्बर आणि कन्हैयाकुमार हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिल्लीतील सातही जागांवर भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशी एकास एक लढत होणार आहे. आप आणि काँग्रेसने प्रथमच भाजपविरुद्ध संयुक्त उमेदवार उभे केले आहेत. आप चार जागा तर काँग्रेस तीन जागा लढवत आहे.