मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आज मतदान

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी प्रचाराची धुरा वाहिली.
मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आज मतदान

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये विधानसभेसाठी शेवटच्या, तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने ३५०, तर भाजपने ६३४ सभा घेतल्या. त्यातील १५ सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या.

भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रामुख्याने प्रचारसभा घेतल्या, तर काँग्रेसतर्फे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वढेरा यांनी सभा घेतल्या.

मध्य प्रदेशात २००३ पासून भाजपचे सरकार आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होत आहे, तर छत्तीसगडमध्ये ७० जागांसाठी मतदान होणार आहे. या राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला झाले होते.

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी प्रचाराची धुरा वाहिली. या दोन्ही नेत्यांनी शेकडो सभा घेतल्या आहेत. चौहान यांनी १६५ सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबल इंजिन सरकारचे फायदे सांगून १५ सभा घेतल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी २१, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १४, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १२ सभा घेतल्या.

तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनीही महत्त्वाच्या सभा घेतल्या, तर केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ८० सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in