देशातील ९६ मतदारसंघांत ६३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९६ मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले.
देशातील ९६ मतदारसंघांत ६३ टक्के मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९६ मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. देश पातळीवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६२.९४ टक्के मतदान झाले. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या असल्या तरी प. बंगालमध्ये देशातील सर्वाधिक, म्हणजे ७५.६६ टक्के मतदान झाले. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये संध्याकाळी देशातील सर्वात कमी, म्हणजे ३५.७५ इतकी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली.

इतर राज्यांपैकी आंध्र प्रदेशात ६८.१२ टक्के, बिहारमध्ये ५५.९२ टक्के, झारखंडमध्ये ६३.४४ टक्के, मध्य प्रदेशात ६८.८६ टक्के, ओडिशामध्ये ६३.८५ टक्के, तेलंगणमध्ये ६१.५४ टक्के आणि उत्तर प्रदेशात ५७.९७ टक्के, जम्मू-काश्मीरात ३६.८८ टक्के मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशात रस्ते आणि विकासाच्या अभावाच्या निषेधार्थ शाहजहानपूरच्या काही गावांमध्ये लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचीही नोंद झाली आहे.

आमदाराने मतदाराला थोबडवले, मतदारानेही केली परतफेड

आंध्र प्रदेशातील सत्तारूढ वायएसआरसीपी पक्षाच्या एका आमदाराने मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराच्या श्रीमुखात भडकावली, या प्रकाराने संतप्त झालेल्या त्या मतदारानेही आमदाराच्या श्रीमुखात भडकावून अपमानाची परतफेड केली. मतदानासाठी रांगेत उभे न राहता आमदार ए. शिवकुमार थेट मतदान करण्यासाठी केंद्रात जात होते, त्याला एका मतदाराने आक्षेप घेतला. त्याचा राग आल्याने आमदाराने त्या मतदाराच्या श्रीमुखात भडकावली, या प्रकाराने संतप्त झालेल्या मतदारानेही आमदाराच्या श्रीमुखात भडकावून अपमानाचे उट्टे काढले. तेलुगु देशम पक्षाने या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे.

logo
marathi.freepressjournal.in