राधाकृष्णन यांनी घेतली मोदींची भेट

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झालेल्या सीपी राधाकृष्णन यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर रविवारी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
राधाकृष्णन यांनी घेतली मोदींची भेट
Photo : X (Narendra Modi)
Published on

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झालेल्या सीपी राधाकृष्णन यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर रविवारी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मोदींनी 'एक्स'वर या भेटीचे फोटो शेअर करत म्हटले की, राधाकृष्णन यांची भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचा विविध क्षेत्रातील दीर्घ अनुभव आपल्या देशाला नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यांनी नेहमीच दाखवलेल्या समर्पणाने आणि दृढनिश्चयाने ते देशाची सेवा करत राहोत, असे मोदी म्हणाले.

राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रविवारीही त्यांच्यासाठी खास पोस्ट केली होती. आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये मोदी म्हणतात, "सीपी राधाकृष्णन यांना खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून मोठा अनुभव आहे. राज्यपाल त्यांनी पदाच्या कारकीर्दीत नेहमीच सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित केले. या अनुभवांमुळे त्यांना कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींचे विस्तृत ज्ञान आहे. त्यांनी तामिळनाडूमध्येही तळागाळात व्यापक काम केले आहे. एनडीएने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे.

या भेटीपूर्वी त्यांचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भूपेंद्र यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता स्वागतासाठी उपस्थित होत्या.

उपराष्ट्रपतीपद : खासदार तिरुची शिवा विरोधकांचे उमेदवार?

महाराष्ट्राचे राज्यपाल व मूळचे तमिळनाडूचे सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत, तर विरोधकही तमिळनाडूमधूनच उमेदवार देण्याची तयारी करत आहेत. विरोधक द्रमुकचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. यामुळे डीएमकेसमोरील तमिळी अस्मितेचे मोठे संकट दूर होणार आहे. प्रादेशिक राजकारणामुळे निर्माण झालेल्या प्रमुख अडथळ्यावर मात करण्यासाठी ही खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. डीएमकेने शिवा यांच्यासह 'इस्रो'चे माजी वैज्ञानिक अण्णादुराई यांचेही नाव सुचविले आहे.

logo
marathi.freepressjournal.in