
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. चेंगराचेंगरीत ३० जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने महाकुंभमेळ्यातील व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला भाविकांच्या सुविधेसाठी आणि भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी कडक निर्देश दिले आहेत. प्रशासनाने देखील कडक नियम लागू केले आहे. महाकुंभमेळ्यातील आगामी अमृत स्नानासाठी भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी नियमांमध्ये ५ महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. यामध्ये व्हीव्हीआयपी पास, वाहनांना नो एंट्री या नियमांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण महाकुंभमेळा क्षेत्राला वाहन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता मेळा क्षेत्रात कोणालाही कोणत्याही प्रकारचे वाहन आतमध्ये नेता येणार नाही.
महाकुंभमेळ्यात करण्यात आलेले नवीन बदल
१. महाकुंभमेळ्याचे संपूर्ण क्षेत्र आता वाहन प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे. या नियमानुसार कोणतेही वाहन मेळ्याच्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही.
२. प्रशासनाने सर्व प्रकारचे व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात केले आहेत. त्यामुळे विशेष पासने देखील वाहनांना आत प्रवेश मिळणार नाही.
३. मेळा क्षेत्रात आता एकेरी मार्ग व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे एक मार्गाने आत जाता येणार आहे तर दुसऱ्या मार्गाने बाहेर जाता येणार आहे.
४. प्रयागराजला लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमेवरच वाहनांना थांबवण्यात येणार आहे.
५. 4 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीपर्यंत हे नियम अतिशय कडकपणे लागू करण्यात येणार असून शहरात सर्व प्रकारच्या चार चाकी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वसंत पंचमीला पुढील अमृतस्नान होणार आहे.
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला बुधवारी (29) पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे वेगवेगळ्या स्तरांमधून प्रशासकीय व्यवस्थेवर बोट ठेवले. त्यानंतर प्रशासन भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून सावध झाले असून, भाविकांच्या सोयीसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.