
न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
रविवारी सकाळी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडीलही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. १९७३ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ प्रकाशित झाला होता. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी मैफिलीत सादर केलेल्या तबलावादनाला पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांची दाद मिळाली होती.
२०१६ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना ‘ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट’मध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले. झाकीर हुसेन यांनी काही सिनेमांमध्ये काम केले आहे.
१९८३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीट अँड डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. शशी कपूर यांनीही या चित्रपटात काम केले होते. त्यांनी १९९८ साली आलेल्या ‘साज’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात झाकीर हुसैन यांनी शबाना आझमी यांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती.
‘मुघल-ए-आझम’ (१९६०) या चित्रपटात झाकीर हुसेन यांना सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मंजूर केले नाही. आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावे, अशी त्यांची इच्छा होती.
पद्मविभूषण, ग्रॅमीसह विविध पुरस्कारांनी सन्मानित
उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.