साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाहला फाशीची शिक्षा

 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाहला फाशीची शिक्षा

वाराणसीत २००६मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाहला गाझियाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय १६ वर्षांनंतर आला आहे. वलिउल्लाह हा आतापर्यंत कायदेशीर गुंतागुंतीमुळे शिक्षेपासून वाचत आला होता.

डीजीसी क्रिमिनल राजेशचंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ७ मार्च २००६ रोजी वाराणसीच्या संकटमोचन मंदिर, कँट रेल्वे स्टेशन आणि दशाश्वमेध घाट येथे बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ७६ जण जखमी झाले आहेत.

५ एप्रिल २००६ रोजी पोलिसांनी प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलिउल्लाहला अटक केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी वाराणसीहून गाझियाबाद न्यायालयात ट्रान्सफर झाली होती. ४ जून रोजी गाझियाबादचे जिल्हा न्यायाधीश जितेंद्रकुमार सिन्हा यांच्या कोर्टाने वलिउल्लाहला दशाश्वमेध घाट आणि संकटमोचन मंदिरात बॉम्बस्फोट, खून, खुनाचा प्रयत्न, कायद्याविरुद्ध कृती, दहशत पसरवणे आणि स्फोटक पदार्थ वापरणे याप्रकरणी दोषी ठरवले होते. तर कँट रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटातील पुराव्याच्या आधारे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

वलिउल्लाहच्या चौकशीत त्याचे साथीदार मुस्तकीम, झकेरिया आणि शमीम यांचीही नावे समोर आली होती. हे सर्वजण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. बॉम्बस्फोटाला १६ वर्षे झाली तरी हे आरोपी पकडले गेलेले नाहीत. सुरक्षा यंत्रणांच्या मुसक्या आवळल्यानंतर हे आरोपी बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पळून गेले आणि परतलेच नाहीत. या स्फोटांना १६ वर्षे उलटूनही तिन्ही आरोपी पकडले जात नसल्याने देशातील सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in