
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टाकलेल्या ‘टॅरिफ बॉम्ब’चे जागतिक बाजारात परिणाम दिसू लागले आहेत. ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर वॉलमार्ट, ॲमेझॉन, टार्गेट व गॅप यांसारख्या प्रमुख अमेरिकन किरकोळ विक्रेत्या कंपन्यांनी भारतातील त्यांच्या ऑर्डर्स रोखल्या आहेत. भारतीय निर्यातदारांना याच गोष्टीची काळजी सतावत होती तेच आता घडत आहे.
ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ बॉम्ब’नंतर अमेरिकेतील कंपन्या भारतीय वस्तूंच्या आयातीबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारतीय निर्यातदारांना काळजी वाटत होती की टॅरिफमध्ये वाढ झाल्यास त्यांच्या ऑर्डर्सवर परिणाम होऊ शकतो आणि आता नेमके तेच घडत आहे. एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, भारतीय निर्यातदारांना अमेरिकन खरेदीदारांनी पत्रे व ई-मेल पाठवले आहेत. ज्यामध्ये त्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत टेक्स्टाइल्स (कापड) शिपमेंट थांबवण्याची विनंती केली आहे.
भारतीय निर्यातदार चिंतेत
अमेरिकन कंपन्यांची इच्छा आहे की, टॅरिफमुळे वाढलेल्या खर्चाचा भार भारतीय निर्यातदारांनी उचलावा. टॅरिफमुळे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूंच्या किमती ३० ते ३५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील प्रमुख निर्यातदार कंपन्या चिंतेत आहेत. वेल्सपून लिव्हिंग, गोकलदास एक्स्पोर्ट्स, इंडो काऊंट व ट्रायडेंटसारख्या भारतातील मोठ्या निर्यातदार कंपन्या त्यांची ४० ते ७० टक्के निर्यात एकट्या अमेरिकेत करतात.
४३ हजार कोटींचे नुकसान
या निर्णयाचा भारतीय कापड उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे एकूण खर्चात ३० ते ३५ टक्के वाढ होईल. तसेच अमेरिकेतून येणाऱ्या ऑर्डर्समध्ये ४० ते ५० टक्के घट होईल. तज्ज्ञांच्या मते यामुळे ४ ते पाच अब्ज डॉलरचे म्हणजेच ३५ ते ४३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.