‘वक्फ’वरून प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; पोलिसांची वाहने पेटविली

दक्षिण २४ परगणा येथे वक्फ कायद्याच्या विरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी कोलकाता पोलिसांचे पथक तैनात होते.
दक्षिण २४ परगणा येथे वक्फ कायद्याच्या विरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी कोलकाता पोलिसांचे पथक तैनात होते.एएनआय
Published on

कोलकाता : वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात देशभर संतापाची लाट उसळत असताना आता पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्यांदा हिंसाचाराचा उद्रेक झाला. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा येथे वक्फ कायद्याच्या विरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. मुर्शिदाबाद येथील तणाव दोन दिवसांनी निवळून स्थिती पूर्वपदावर येत असतानाच आता २४ परगणा येथे हिंसाचाराचा उद्रेक झाला.

बॅरिकेट्स तोडले, वाहने जाळली

कोलकात्याच्या रामलीला मैदानावर आयोजित रॅलीत जाण्यापासून पोलिासंनी आयएसएफ कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे हा हिंसाचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयएसएफ नेते नेते आणि भांगरचे आमदार नौशाद सिद्दीकी या कार्यक्रमात भाषण करणार होते. भांगर, मीनाखान आणि संदेशखली येथील अनेक निदर्शकांना बसंती महामार्गावरील भोजेरहाट येथे रोखण्यात आले. बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न झाल्याने ताणवही निर्माण झाला आणि संघर्ष वाढतच गेला. पोलिसांच्या अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या, या वेळी अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये आयएसएफच्या एका समर्थकाच्या डोक्याला दुखापत झाली.

या हिंसाचारामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निदर्शकांना अखेर परिसरातून हटवण्यात आले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पांगविण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यानंतर जमाव अधिक संतप्त झाला त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली काही वाहने पेटवून दिली. व्हिडिओमध्ये काही आंदोलनकर्ते अनेक दुचाकी जळताना दिसत आहेत.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप करत आहेत. आयएसएफ हा प्रादेशिक पक्ष आहे. पोलिसांनी भांगरहून येणाऱ्या आयएसएफ कार्यकर्त्यांच्या वाहनांना कोलकात्याच्या रामलीला मैदानाकडे जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी बसंती एक्सप्रेसवे रोखला.

logo
marathi.freepressjournal.in