
कोलकाता : वक्फ सुधारणा विधेयकावरून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचाराचा उद्रेक झाला तो पूर्वनियोजित कट होता आणि बंगालमधील हिंसाचारात बांगलादेशमधील दंगलखोरांचा सहभाग होता, असा धक्कादायक खुलासा प्राथमिक तपासातून उघड झाला आहे.
वक्फ दुरुस्ती कायद्यावरून पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वक्फ विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनात तीन जणांचा मृत्यू झाला, तर २०० जणांना अटक करण्यात आली.
‘अन्सार-उल-बांगला’चा हात
वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल केंद्रीय तपास यंत्रणांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या हिंसाचारामागे बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना ‘अन्सार उल बांगला’ टीम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या भागात ‘एबीटी’ स्लीपर सेल सक्रिय आहेत, जे बऱ्याच वेळापासून या हिंसाचाराची योजना आखत होते, अशी माहिती माध्यमांनी दिली. सरकारी सूत्रांनुसार, हिंसाचारात काही बांगलादेशी लोकांचा सहभाग होता.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बंगालमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जांगीपूर, आणि शमशेरगंजसारख्या संवेदनशील भागात बीएसएफ, सीआरपीएफ, आणि आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.