आग्रा : उत्तर प्रदेश, दिल्ली आणि आग्रा येथे गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध ताज महालच्या परिसरात पाणी साचले असून तीन घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. तथापि, घुमटातून पाण्याची गळती होत असली तरी अद्याप ताज महालचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा पुरातत्त्व विभागाने केला आहे.
ताज महाल परिसरातील उद्यानामध्ये पाणी साचल्याचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला. ताज महालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची माहिती खरी आहे, असे पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. घुमटाची तपासणी केली असता मुसळधार पावसामुळे पाणी झिरपून गळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही घुमटाची तपासणी करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पर्यटक येथे व्हिडीओ काढण्यासाठी येऊ लागले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आग्रा येथे गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांत पाणी साचले आहे. पावसामुळे येथील एक राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे, तर काही भागांतील शेतांमध्ये तळे साचले असून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्येही पाणी साचले आहे, तर शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्येही पाणी साचले आहे.