Wayanad Landslides: वायनाड बळींचा आकडा ३६५ वर, २०६ जण अद्यापही बेपत्ता

घटनेच्या सहाव्या दिवशी रविवारी शोधमोहीम आणि बचावकार्य सुरू होते. २०६ जण अद्यापही बेपत्ता आहेत.
Wayanad Landslides: वायनाड बळींचा आकडा ३६५ वर, २०६ जण अद्यापही बेपत्ता
Published on

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात बळींची संख्या ३६५ वर पोहचली आहे. त्यात ३० मुलांचा समावेश आहे. घटनेच्या सहाव्या दिवशी रविवारी शोधमोहीम आणि बचावकार्य सुरू होते. २०६ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर मदत शिबिरांमध्ये राहत असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरांमध्ये चोरी होत आहे. काही लोक रात्रीच्या वेळी घरात घुसून महागड्या वस्तूंची चोरी करत आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जात आहे.

रविवारी सकाळी ७ वाजता या भागांत शोधमोहीम सुरू करण्यात आली. सहा टीममध्ये सहभागी असलेले १२६४ लोक मुंडक्कई, चुरालमाला आणि सामलीमट्टम येथे शोधमोहीम राबवत आहेत. बचावकार्य अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी शनिवारी सांगितले होते.

कलाकारांकडून मदतीचा ओघ

वायनाड भूस्खलनातील नुकसानग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा ओघ वाढत आहे. कलाकारांसह अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्री संकट निवारण निधीला मदतीचा हात दिला आहे. तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुन २५ लाखांची मदत करणार आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. केरळने मला भरभरून प्रेम दिले आहे. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाने मला फार दु:ख झाल्याचे तो म्हणाला.

मल्ल्याळम् चित्रपटांतील दिग्गज आणि भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल असलेले मोहनलाल हे आपल्या लष्करी गणवेशात वायनाड येथे पोहचले. तेथे त्यांनी आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

तसेच तामिळ अभिनेता कमल हसन, सुरिया, ज्योतिका, कार्थी, विक्रम, नयनतारा आणि विघ्नेश सिवन आणि मल्ल्याळम‌ सितारे मम्मुत्ती, दुलक्वीर सलमान, फहाद फासिल नाझरिया आणि टोविनो थॉमस यांनीही मुख्यमंत्री संकट निवारण निधीला मदत केली आहे. चिरंजीवी आणि त्याचा मुलगा-अभिनेता राम चरण यांनी रविवारी भूस्खलनग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

‘वायनाडच्या पुनर्बांधणीसाठी यूडीएफचे पूर्ण सहकार्य’

भूस्खलनाने उद्ध्वस्त झालेल्या वायनाडच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली. त्यांचे सर्व आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री संकट निवारण निधीला देणार आहेत. विरोधी पक्षनेते व्ही. डी. साथिसन रविवारी म्हणाले की, पुनर्वसनाच्या प्रयत्नांत यूडीएफ मदत करेल.

logo
marathi.freepressjournal.in