Wayanad landslides : अमित शहांचा दावा केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळला; म्हणाले - "हवामान खात्याने केवळ..."
Photo - ANI

Wayanad landslides : अमित शहांचा दावा केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळला; म्हणाले - "हवामान खात्याने केवळ..."

मुसळधार पावसामुळे वायनाडवर नैसर्गिक आपत्ती कोसळू शकते, असा इशारा केंद्र सरकारने २३ जुलै रोजीच केरळ सरकारला दिला होता आणि त्याच दिवशी राज्यात एनडीआरएफची नऊ पथके रवाना केली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. मात्र...
Published on

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे वायनाडवर नैसर्गिक आपत्ती कोसळू शकते, असा इशारा केंद्र सरकारने २३ जुलै रोजीच केरळ सरकारला दिला होता आणि त्याच दिवशी राज्यात एनडीआरएफची नऊ पथके रवाना केली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने संभाव्य नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना केरळला दिली होती, हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला दावा निराधार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी स्पष्ट केले. हवामान खात्याने केवळ ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, ज्या ठिकाणी आपत्ती ओढवली तेथे ‘ऑरेंज अलर्ट’ होता. आपत्तीपूर्वी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला नव्हता. भूस्खलन झाल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजता ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला, आपण कोणालाही दूषण देत नाही, ही दूषणे देण्याची वेळही नाही, असेही विजयन यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केंद्र सरकारने इशारा दिलेला असतानाही केरळ सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही, इतकेच नव्हे तर एनडीआरएफची पथके राज्यात दाखल झाली आहेत असेही स्पष्ट केले नाही, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे केरळ सरकार आणि तेथील जनतेच्या पाठीशी या संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहील आणि केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असे आश्वासनही शहा यांनी दिले आहे.

संकटाची आगाऊ सूचना देणारी केंद्राची यंत्रणा असून त्यावरच विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यावर शहा यांनी टीका केली, २३ जुलैच नव्हे तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ जुलै रोजीही केरळला इशारा देण्यात आला होता, असेही गृहमंत्री म्हणाले. एनडीआरएफची नऊ पथके २३ जुलै रोजी पाठविण्यात आली होती, तर आणखी तीन पथके ३० जुलै रोजी पाठविण्यात आली आहेत. केरळ सरकारने इशाऱ्याकडे तातडीने लक्ष दिले असते तर नुकसान कमी झाले असते, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in