पीओके लिलया मिळवू! आधी आपलं घर सांभाळा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर पाकिस्तान सरकार ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत आहे, याची आम्हाला वेदना होते
पीओके लिलया मिळवू! आधी आपलं घर सांभाळा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा
Published on

पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारताला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तो आम्ही लिलया मिळवू. भारताच्या ताब्यातील काश्मिरी जनता सुखी आहे, पण पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर पाकिस्तान सरकार ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत आहे, याची आम्हाला वेदना होते. पाकने आधी देशांतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. काश्मिरींची चिंता सोडावी, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. जम्मू विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या संरक्षणविषयक परिषदेला सोमवारी संबोधित करताना त्यांनी हे उद‌्गार काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाला अभय देत असल्याबद्दल सुनावले होते. यावर पाकने आगपाखड केली आहे. याचा समाचार घेताना राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘भारत आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. दहशतवादाविरुद्ध जग एकत्र येत आहे. गरज भासल्यास भारत सीमेच्या अलीकडे किंवा पलीकडेही वार करू शकतो. उरी आणि पुलवामा येथे झालेले दहशतवादी हल्ले दुर्दैवी होते. दहशतवादाचा प्रसार करणाऱ्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. उरी हल्ल्यानंतर २०१६ साली सर्जिकल स्ट्राइक्सची योजना आखताना आणि २०१९ साली बालाकोट येथे हवाई हल्ले करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेण्यास दहा मिनिटांचाही वेळ घेतला नाही. देशाची सेनादले आता कोठेही कारवाई करण्यास सक्षम आहेत. संपूर्ण जग आज दहशतवादाविरुद्ध एकत्र येत आहे. दहशतवादाचा प्रसार करणाऱ्यांना हे समजले पाहिजे की त्यांचा हा खेळ आता फार काळ चालणार नाही, असे सिंह यांनी सांगितले.

‘‘पाकव्याप्त काश्मीर भारताचे होते, आहे आणि भविष्यातही भारताचेच राहील,’’ असे पाकला ठणकावून सांगताना राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘ईशान्य भारतात बहुतांशी भागात शांतता प्रस्थापित झाल्याने तेथील अनेक भागांतून आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट (अफस्पा कायदा) मागे घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्येही दीर्घकाळ शांतता राहिल्यास तेथूनही हा कायदा हटवण्यात येऊ शकतो,’’ असेही त्यांनी यावेळी म्हटले.

पाकव्याप्त काश्मिरी भारतात येण्याची मागणी करतील

राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर पाकिस्तान अत्याचार करत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे. हे पाहुन भारतातील काश्मिरी जनतेला वेदना होतात. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात घेण्यासाठी आम्हाला फारसे काही करावे लागणार नाही. तिथली जनताच भारतात जाण्याची मागणी करेल. तिथे भारतात जाण्याची इच्छा व्यक्त करणारे फलक दिसायला लागलेदेखील आहेत.

ओबामांना सुनावले

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतात अल्पसंख्य सुरक्षीत नसल्याचे विधान एका दुरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. याचा समाचार घेताना राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘ओबामाजी, भारत साऱ्या जगाला एक कुटुंब मानते. भारताची विश्वबंधुत्वाची भावना आहे. तुम्ही किती मुस्लीम देशांवर हल्ले केले, ते आधी सांगा,’’ अशा शब्दांत ओबामांना सुनावले.

logo
marathi.freepressjournal.in