
''माझ्या एका नातेवाईकाला गर्दीने फरफटत नेले...सीआरपीएफ, पोलिसांनाही बरेच फोन केले पण खूप वेळ उलटूनही मदत मिळाली नाही...आम्ही कसेबसे बाहेर पडलो...'', प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात संगम तीरावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी त्यांना आलेले भयावह अनुभव वृत्तसंस्था 'आयएनएस'ला सांगितले.
चेंगराचेंगरीत अडकलेल्या एका भाविकाने सांगितले, ''माझी बहीण, बहिणीची सून सगळे तिथे होते. सुरुवातीला थांबवून ठेवण्यात आले होते आणि नंतर जेव्हा सोडण्यात आले तेव्हा पाठीमागून गर्दीने एकदम जोरात लोटले. यामध्ये एक नातेवाईक खाली पडले, त्याला गर्दीने पायदळी तुडवत फरफटत नेले. आता ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. आम्ही पुन्हा आत जाऊन पाहिले मात्र ते सापडत नाही.''
तर, आसाममधील एका महिलेने आरोप केला की आम्ही सकाळी आसामवरून आलो. स्नानासाठी गेलो. खूप गर्दी होती. जेव्हा चेंगराचेंगरी झाली. त्यात आम्ही अडकलो. दुर्घटना घडल्यानंतर आम्हाला बराच वेळ मदत मिळाली नाही. आम्ही सीआरपीएफ आणि पोलिसांनाही बरेच फोन केले पण, अर्धा तास उलटला तरी कोणीही आले नाही. अखेर आम्हीच आमच्या माणसाला रुग्णालयात नेले.
चेंगराचेंगरीतून एका भाविकाने ते आणि त्यांचे कुटुंब कसे सुरक्षित बाहेर पडले याचा अनुभव सांगितला, ''आम्ही गर्दीत अडकलो होतो. स्नान करण्यासाठी एकदमच खूप गर्दी झाली. यावेळी लोक एकमेकांना पायदळी तुडवत पुढे जात होते. आम्ही तेथून उठू शकत नव्हतो. मी सर्वात आधी कसाबसा बाहेर पडलो. त्यानंतर, मुलांना आणि माझ्या आई-वडिलांना मदत केली. गर्दीत किमान 50-60 लोक खाली दबले होते.''
मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नानासाठी आलेल्या भाविकांपैकी एकाने सांगितले, ''माझे नाव इंद्रपाल आहे. संगमाजवळ आम्हाला आधी थांबवून ठेवले. नंतर जेव्हा सोडले तेव्हा एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला आम्ही गर्दीत अडकलो. नंतर माझा मेहुणा खाली पडला आणि मागे राहिला. आता ते कुठे आहे मला माहित नाही. त्यांनी कुर्ता-धोती घातले आहे. मला माझ्या मेहुण्याबद्दल काळजी वाटतेय.''
कर्नाटकहून आलेल्या विद्या साहू यांनी सांगितले की, ''आम्ही बेळगावहून ग्रुप करून आलो आहोत. एकूण दोन बसमध्ये 60 जण आहोत. आमचा नऊ जणांचा ग्रुप आहे. स्नानासाठी जात असताना मागून अचानक लोकांनी आम्हाला ढकलले. समोर विरुद्ध दिशेला एक खांब होता. तिथे आम्ही अडकलो. आम्हाला नंतर अॅम्ब्यूलन्सने आणण्यात आले. काही जण रुग्णालयात दाखल आहेत. आमच्यापैकी एकाला अजून शुद्ध आलेली नाही.''
मौनी अमावस्येचे अमृत स्नान महाकुंभातील सर्वात महत्त्वाचा विधी आहे. आजच्या मौनी अमावास्येनिमित्त शाही स्नानासाठी रात्रीपासूनच भाविकांची प्रचंड मोठी गर्दी येथे झाली होती. पहाटे २ च्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत काहींचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमीही झालेत. मात्र, अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि, प्रशासनाने आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, 'गंगा मातेच्या जवळच्या तीरावरच स्नान करा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका', असे आवाहन भाविकांना केले आहे.