आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान दिले आहे.
संग्राहित छायचित्र
संग्राहित छायचित्र

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान दिले आहे. रविवारी आपण स्वत: आणि आपचे अन्य उच्चपदस्थ नेते भाजपच्या मुख्यालयावर येणार आहोत, इच्छा असेल त्यांना अटक करून दाखवाच, असे आव्हान केजरीवाल यांनी दिल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पक्ष चिरडून टाकणे अशक्य

आपचे खासदार राघव चढ्ढा आणि दिल्लीचे मंत्री आतिशी व सौरभ भारद्वाज यांनाही कारागृहात पाठविण्यात येणार असल्याचे भाजपचे म्हणणे असल्याचा दावा केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला. आपच्या नेत्यांना कारागृहात टाकून आपला पक्ष चिरडून टाकता येऊ शकत नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांना कारागृहात टाकण्याचा खेळ मोदी खेळत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. त्यामुळे रविवारी दुपारी आपण स्वत:, पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्यासह भाजपच्या मुख्यालयात जाणार आहोत म्हणजे ज्या नेत्यांना कारागृहात पाठविण्याची मोदी यांची इच्छा आहे त्यांना ते कारागृहात पाठवू शकतील, असे केजरीवाल म्हणाले.

आप ही एक विचारसरणी आहे, आपच्या जितक्या नेत्यांना आपण कारागृहात पाठवाल त्याच्या १०० पटीने देश नेते निर्माण करील, आप सरकारने दिल्लीत चांगल्या शाळा बांधल्या, मोहल्ला दवाखाने स्थापन केले, अहोरात्र वीजपुरवठा सुरू ठेवला, हाच आमचा दोष आहे. कारण भाजप तसे करू शकला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपने केले मालीवाल यांना ब्लॅकमेल आप नेत्या आतिशी यांचा दावा

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर बेकायदेशीर भरतीप्रकरणी आरोप करण्यात आले असून भाजपने मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या कारस्थानात सहभागी करून घेण्यासाठी मालीवाल यांना ब्लॅकमेल केल्याचा दावा आपच्या नेत्या आतिशी यांनी शनिवारी केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सचिव विभावकुमार याने मालीवाल यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून २४ तास झाले असतानाही पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदविलेला नाही. दिल्ली पोलीस हे भाजपचे हत्यार आहे आणि दिल्लीतील लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे. तर मालीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आपचे नेते संपादित व्हिडीओ व्हायरल करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

...तर मुख्यमंत्र्यांवरच आरोप झाले असते

मालीवाल सोमवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेटीची वेळ न घेताच गेल्या होत्या. केजरीवाल यांच्या निवासस्थानी मालीवाल का घुसल्या, भेटीची वेळ न घेताच त्या तेथे का गेल्या, त्या दिवशी केजरीवाल कामकाजात व्यस्त होते. त्यामुळे ते मालीवाल यांना भेटू शकले नाहीत, जर केजरीवाल त्या दिवशी मालीवाल यांना भेटले असते तर विभवकुमार यांच्याऐवजी मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांवरच आरोप केले असते, असे आतिशी म्हणाल्या.

मालीवालांच्या खांद्यावर बंदूक

भाजपने या कारस्थानासाठी मालीवाल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. भाजपची एक पद्धत आहे. प्रथम ते गुन्हा दाखल करतात आणि नंतर ते नेत्यांना कारागृहात पाठविण्याची धमकी देतात. स्वाती मालीवाल यांच्यावर बेकायदेशीर भरतीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. एफआयआरही नोंदविण्यात आला असून त्याबद्दल मालीवाल यांना कधीही अटक होऊ शकते, अशा टप्प्यावर हे प्रकरण आले आहे. त्यामुळे भाजपने मालीवाल यांना ब्लॅकमेल केले आणि या कारस्थानासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे, असेही आतिशी म्हणाल्या.

दिल्ली पोलीस नि:पक्षपाती असतील त्यांनी विभवकुमार यांनी मालीवाल यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनुसार एफआयआर नोंदवावा, दिल्ली पोलीस मालीवाल यांच्याविरुद्ध घुसखोरी, सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न आदी गुन्हे नोंदविणार आहेत का, असे सवालही आतिशी यांनी उपस्थित केले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून विभवकुमार याला अटक

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सचिव विभवकुमार याला शनिवारी अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्या निवासस्थानातून विभवकुमार याला शनिवारी दुपारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विभावकुमार याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असताना १३ मे रोजी विभावकुमार याने आपल्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in