नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले की त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणेज ५ जून रोजी आपण तिहार कारागृहाच्या बाहेर असू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आपच्या नगरसेवकांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे, २ जून रोजी त्यांना पुन्हा कारागृहात परतावे लागणार आहे. मतदान सात टप्प्यात होणार असून १ जून रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना आपला अपमान करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप केजरीवाल यंनी नगरसेवकांना संबोधताना केला. तिहार कारागृहात ज्या कक्षात होतो तेथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे होते आणि त्यावर १३ अधिकारी लक्ष ठेवून होते. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या कार्यालयातही ते उपलब्ध करून देण्यात आले होते, मोदी यांचे आपल्यावर लक्ष होते, मोदींच्या मनात आपल्याबद्दल इतकी अढी का आहे ते माहिती नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
आपल्याला तिहार कारागृहात २ जूनला परतावे लागणार आहे, निवडणुकीचा निकाल कारागृहातूनच पाहावा लागणार आहे, मात्र इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ५ जून रोजी आपण कारागृहाबारे असू, असे केजरीवाल म्हणाले.