छत्तीसगडमधून नक्षलवाद संपवू! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार

केंद्र सरकार व छत्तीसगड सरकार ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी बांधिल आहोत, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केला. छत्तीसगड नक्षलमुक्त होताच देशभरातून नक्षलवाद संपेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

रायपूर : केंद्र सरकार व छत्तीसगड सरकार ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी बांधिल आहोत, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केला. छत्तीसगड नक्षलमुक्त होताच देशभरातून नक्षलवाद संपेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायपूर येथील प्रेसिडेंट पोलिस कलर अवॉर्ड कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, छत्तीसगड पोलिसांनी एका वर्षातच नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आहे. सरकार बदलल्यानंतर टॉप १४ नक्षलवाद्यांना निष्प्रभ करण्यात आले आहे. चार दशकांत प्रथमच नागरिक आणि सुरक्षा दलांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. दहा वर्षात नक्षलवादाला आळा बसला. छत्तीसगडसह सर्व राज्यांमध्ये नक्षलवादा विरोधातील शवपेटीत शेवटचा खिळा ठोकण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

‘राष्ट्रपती कलर्स’ केवळ सजावट नसून ते त्यागाचे प्रतीक आहेत. तुम्हाला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याची ही आठवण आहे. एक सजावट तसेच जबाबदारी. मला विश्वास आहे की छत्तीसगड पोलिसांचा प्रत्येक जवान ही जबाबदारी पार पाडेल. आपल्या कर्तव्यात कधीच मागे हटणार नाही, असे शहा म्हणाले.

मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, छत्तीसगड राज्याच्या स्थापनेपासून २४ वर्षांत पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. ही वस्तू केवळ छत्तीसगड पोलिसांच्या गणवेशाला शोभेल असे नाही, तर आपल्या जवानांच्या कर्तव्याचे, निष्ठा, धैर्य आणि समर्पणाचे प्रतीकही बनेल. याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो.

नक्षलविरोधी कारवायांमध्ये धाडस आणि दृढनिश्चयाने छत्तीसगड पोलिसांनी गेल्या एक वर्षात प्रचंड यश मिळवले आहे. मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतत आहेत. सैनिकांनी मोठी कामगिरी केली आहे, असे साई म्हणाले.

या कार्यक्रमात शहा आणि मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी राष्ट्रपतींच्या ध्वजाला सलामी दिली. राष्ट्रपती पोलिस कलर फ्लॅग बस्तरच्या संस्कृतीचे चित्रण करते. ज्यात गौर, मडिया सिंह आणि भातशेती समाविष्ट आहेत. ध्वजाच्या वर आणि खालच्या बाजूला ३६ किल्ले आहेत.

शस्त्रे सोडा, मुख्य प्रवाहात सामील व्हा!

शहा यांनी नक्षलवाद्यांना आवाहन केले की, आमच्या सरकारने नक्षलवाद्यांसाठी खूप चांगले आत्मसमर्पण धोरण बनवले आहे. तुम्ही मुख्य प्रवाहात सामील व्हा. शस्त्रे सोडा. विकासाच्या वाटेवर या.

logo
marathi.freepressjournal.in