Weather Update : मान्सून पाच दिवस आधीच केरळममध्ये येणार

यंदा मान्सून केरळममध्ये २६ मे रोजी दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला.
Weather Update : मान्सून पाच दिवस आधीच केरळममध्ये येणार
Weather Update : मान्सून पाच दिवस आधीच केरळममध्ये येणार प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : यंदा मान्सून केरळममध्ये २६ मे रोजी दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला. साधारणपणे मान्सून १ जूनच्या आसपास केरळममध्ये पोहोचतो, त्यानंतर देशाच्या इतर भागांना व्यापण्यासाठी तो हळूहळू उत्तरेकडे सरकतो, असेही हवामान विभागाने सांगितले. गेल्या वर्षी मान्सून २४ मे रोजी आला होता. तसेच २०२५ मध्ये सामान्यपेक्षा ८% जास्त पाऊस झाला होता.

सध्या मात्र देशाचा अर्ध्याहून अधिक भाग उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये गुरुवारी तापमान ४०°सें. च्या वर नोंदवले गेले. महाराष्ट्रातील अकोला ४५.९°सें. सह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. जळगाव, वर्धा आणि अमरावतीमध्येही पारा ४५°सें. च्या वर नोंदवला गेला. राजस्थानमधील फलोदीमध्ये तापमान ४५.२°C, जैसलमेर आणि बाडमेरमध्ये ४५.१°C नोंदवले गेले. श्रीगंगानगरमध्ये ४४.८°C आणि जोधपूरमध्ये ४४°C तापमान होते. जयपूर, बिकानेर आणि नागौरमध्ये दिवसभर उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती राहिल्यानंतर संध्याकाळी पाऊस पडला. यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला.

कोकण किनारपट्टीवर ६ जून रोजी अपेक्षित

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या ६ जून रोजी कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास शेती कामांना वेग येण्याची शक्यता असून, उष्णतेने त्रस्त नागरिकांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in