यंदा कडाक्याची थंडी; अवकाळीचा मुक्काम डिसेंबरपर्यंत; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर आता यंदाचा हिवाळासुद्धा नागरिकांसाठी ‘थंडा थंडा कुल कुल’ ठरणार आहे. महाराष्ट्रात मान्सून परतताच साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडेल, असा अंदाज आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर आता यंदाचा हिवाळासुद्धा नागरिकांना सुखद गारवा देणारा ठरणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत देशात ‘थंडा थंडा कुल कुल’ अशी परिस्थिती राहणार असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तवला आहे.

दिवसा कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढणार असून, रात्री मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. यंदाचा पावसाळा हा देशात सर्वत्र चांगला राहिला. जून ते सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा ७.५ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य भारतात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. आता नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत मध्य भारतात किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील. मात्र, कमाल तपामानात वेगाने वाढ होऊन ते सरासरीपेक्षा जास्तच राहील, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ‘ला निना’ वादळाचा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातच ‘ला निना’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. जर ‘ला निना’चा प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमानात लक्षणीयरित्या घट होऊ शकते.

यंदा मान्सूनचे आगमन पाच दिवस उशिराने झाले, तसेच आता त्याचा परतीचा प्रवासही उशिरा होणार आहे. महाराष्ट्रातून १० ते १२ ऑक्टोबर, तर देशातून १८ ऑक्टोबरच्या सुमारास मान्सून माघारी परतणार आहे. मात्र, अवकाळीचे प्रमाण यंदा सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. देशात अवकाळी पावसाचा मुक्काम डिसेंबरपर्यंत राहणार असून, तो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सुरू होणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ११५ टक्के, तर फक्त ऑक्टोबर महिन्यात ११२ टक्के पाऊस राहील. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड या भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

राज्यात गारठा जाणवणार

देशाच्या काही भागांत यंदा पारा मोठ्या प्रमाणात खाली येणार आहे. यात पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतात किमान व कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. मात्र, मध्य भारतात थंडी चांगलीच जाणवणार आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अन् महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मान्सून परतताच साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडेल, असा अंदाज आहे.

‘ऑक्टोबर हिट’ला सुरुवात

ऑक्टोबर महिना सुरुवात झाल्यापासूनच आता अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबईत तापमान ३३ अंशापर्यंत गेले होते. त्यातच किमान तापमानही जास्त असल्याने तसेच आर्द्रतेचे प्रमाण ८१ टक्क्यांवर पोहोचल्याने अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. १० ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यास, कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे. दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी चागलीच जाणवणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in